‘जीएमसी’त मृतदेह आढळल्यास कुणी जबाबदारी घेईना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2019 12:33 PM2019-08-18T12:33:41+5:302019-08-18T12:33:54+5:30
अकोला: सर्वोपचार रुग्णालयात अनेकदा अनोळखी मृतदेह आढळतात; पण त्या मृतदेहाची माहिती पोलिसांना देणे आणि शवविच्छेदनासाठी पाठविण्याची जबाबदारी कोणीच घेत नसल्याचे वास्तव आहे.
अकोला: सर्वोपचार रुग्णालयात अनेकदा अनोळखी मृतदेह आढळतात; पण त्या मृतदेहाची माहिती पोलिसांना देणे आणि शवविच्छेदनासाठी पाठविण्याची जबाबदारी कोणीच घेत नसल्याचे वास्तव आहे. या मुद्यावरून नेहमीच वैद्यकीय अधिकारी अन् शासकीय सोशल वर्कर्समध्ये वाद होत असल्याने येथे गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांच्या मदतीसाठी सोशल वर्कर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत सर्वोपचार रुग्णालयात सहा सोशल वर्कर्स कार्यरत आहेत. सोशल वर्कर्सच्या माध्यमातून रुग्णांना आवश्यक माहिती पुरविण्यासह त्यांना विविध सामाजिक उपक्रमातून आर्थिक मदत पुरवणे अपेक्षित आहे; मात्र त्यांच्यावर इतर प्रशासकीय कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अशातच सर्वोपचार रुग्णालय परिसरात अनोळखी मृतदेह आढळल्यास ब्रॉड बाय म्हणून शासकीय सोशल वर्कर्सची जबाबदारी असल्याचे सांगण्यात येते; परंतु शासकीय सोशल वर्कर्सच्या मते घटनास्थळी उपस्थिती नसताना त्यांना ब्रॉड बाय म्हणून पुढे करणे अयोग्य आहे. अशा परिस्थितीत ही जबाबदारी कोणी स्वीकारावी या बाबत गोंधळाची स्थिती आहे. याचा प्रत्यय तीन दिवसांपूर्वी सर्वोपचार रुग्णालयात अनुभवायला मिळाला. येथील सध्याची परिस्थिती पाहता सर्वत्र गोंधळाची स्थिती असून, सोशल वर्कर्सची नेमकी जबाबदारी काय, येथे आढळणाऱ्या अनोळखी मृतदेह आढळल्यास ब्रॉड बाय म्हणून कोणाचे नाव टाकावे, याचे चिंतन करण्याची गरज आहे.
जबाबदारी कोणाची?
जीएमसी परिसरात अनोळखी मृतदेह आढळल्यास ब्रॉड बाय कोणाला करावे यावरून नेहमीच गोंधळ असतो. अशा परिस्थितीत ज्या व्यक्तीने ही माहिती कळवली त्यालाच ब्रॉड बाय करणे अपेक्षित असल्याचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे यांनी ‘लोकमत’सोबत बोलताना सांगितले.
तीन दिवसांपूर्वी जीएमसी परिसरात अनोळखी मृतदेह आढळल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्वोपचार रुग्णालयात पोहोचलो; पण तोपर्यंत मृतदेह अपघात कक्षात हलविण्यात आले होते. नेमका प्रकार काय, हे माहिती नसल्याने ब्रॉड बाय म्हणून नाव देणे योग्य नव्हते. यापूर्वीदेखील माझ्या माघारीच माझे नाव ब्रॉड बाय म्हणून अशा प्रकरणात टाकण्यात आले होते. त्यासाठी अधिष्ठातांना निवेदनही दिले होते.
- मंगेश ताले, सोशल वर्कर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला
अनोळखी मृतदेहाच्या बाबतीत ज्या व्यक्तीने माहिती दिली त्यालाच ब्रॉड बाय करणे अपेक्षित आहे. शिवाय, सोईसाठी सोशल वर्कर्ससाठी स्वतंत्र दालन निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
- डॉ. कुसुमारकर घोरपडे, अधिष्ठाता, जीएमसी