पातूर पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांचा प्रभार कोणी घेईना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 04:53 AM2020-12-04T04:53:32+5:302020-12-04T04:53:32+5:30
पातूर: गेल्या महिन्याभरापासून पातूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार कोणताही अधिकारी घेण्यास तयार होत नसल्यामुळे या विभागाचे काम ढेपाळले ...
पातूर: गेल्या महिन्याभरापासून पातूर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार कोणताही अधिकारी घेण्यास तयार होत नसल्यामुळे या विभागाचे काम ढेपाळले असून, कर्मचाऱ्यांचे पगार रखडले आहेत.
पातूर पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी अनिल अकाळ आणि मृतक केंद्रप्रमुख यांच्यामधील मारहाण प्रकरणामुळे गेल्या २७ नोव्हेंबरपासून गटशिक्षणाधिकारी रजेवर गेले आहेत. गेल्या महिनाभरापासून गटशिक्षणाधिकारी पदाचा प्रभार कोणताही अधिकारी घेण्यास तयार नाही. गटशिक्षण अधिकारी नसल्यामुळे या विभागाचा कारभार ढेपाळला आहे. पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी अनंत लव्हाळे आहेत. शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती भटकर यांच्याकडे सदर प्रभार देण्याचे पत्र जिल्हा परिषदेने काढले होते; मात्र त्या प्रभार न घेताच वैद्यकीय रजेवर गेल्या. त्यानंतर शालेय पोषण अधिकारी वर्षा कल्याणकर यांना प्रभार घेण्याचा आग्रह करण्यात आला; मात्र त्यांनीही नकार दिला. त्यामुळे येथील गटसाधन केंद्रातील कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेले आहेत. त्याबरोबरच प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा यासंदर्भातील सर्व कामकाज जवळजवळ ठप्प झाले आहे. खरे तर गटशिक्षणाधिकारी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाच्या अधीनस्त असलेले तालुकास्तरावरील अत्यंत महत्त्वपूर्ण पद आहे. शासनाच्या सर्व योजनांची तथा आदेशांची, परिपत्रकांची अंमलबजावणी करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी गटशिक्षणाधिकारी यांच्यावर असते. शासनाने गेल्या आठवड्यात इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शहरात सुरू केल्या. त्याचीही अंमलबजावणी करण्याची जबाबदारी गटशिक्षणाधिकाऱ्यांची असते; मात्र या विभागाचा पदभार गेल्या महिनाभरापासून रिक्त आहे. विद्यार्थ्यांविना सुरू असलेल्या प्राथमिक शाळा, त्याचे मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुख यांना वेळोवेळी विविध स्वरूपाचे अहवाल सादर करावयाचे असतात; मात्र येथे गटशिक्षण अधिकाऱ्याची खुर्ची रिकामी असल्याने आणि विभागातील अनेक अधिकारी सुट्टीवर असल्यामुळे या विभागाचा कारभार ढेपाळला आहे. याकडे जिल्हा प्रशासन लक्ष देईल काय, अशी मागणी होत आहे.
फोटो: