ना फिजिकल डिटन्स, ना मास्क, विद्यार्थ्यांपुढे शिक्षकांची दमछाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2021 10:53 AM2021-02-04T10:53:52+5:302021-02-04T10:54:03+5:30
School News नियमांचे पालन करून घेण्यासाठी शिक्षकांची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अकोला : इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाल्यानंतर आता २३ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहेत. शाळा सुरू झाल्यामुळे पालक व विद्यार्थी समाधानी आहेत. परंतु, शाळेत येणाऱ्या कोरोनामुळे विद्यार्थ्यांना नियंत्रित ठेवण्यासाठी आणि त्यांच्याकडून नियमांचे पालन करून घेण्यासाठी शिक्षकांची चांगलीच दमछाक होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तब्बल दहा महिन्यांपासून शाळा बंद होत्या. विद्यार्थी घरी बसूनच ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घेत होते. ऑनलाईन शिक्षणातही अडचणी येत होत्या. ग्रामीण भागात तर ऑनलाईन शिक्षण पोहोचत नसल्याची ओरड सुरू झाली होती. स्मार्ट फोन नाहीत. असले तरी कनेक्टिव्हिटी नव्हती. अशा अनेक समस्या होत्या. त्यामुळे पालक, विद्यार्थीही त्रस्त झाले होते. त्यामुळे शाळा कधी सुरू होतात. याची पालक वाट पाहत होते. शाळा सुरू झाल्यामुळे पालकांसह विद्यार्थीही आनंदीत झाले आहे. परंतु, शिक्षकांची डोकदुखी वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. अशा परिस्थिती मुलांना संमतीपत्र घेऊन शाळेत प्रवेश देण्यात येत आहे. मास्क, फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझर, आदी नियमांचे शाळांमध्ये पालन करण्यात येत असले तरी शाळांमध्ये लहान मुले अनेकदा फिजिकल डिस्टन्स, मास्कचा वापर करीत नाहीत. या बाबींकडे शिक्षकांना सातत्याने लक्ष द्यावे लागत आहे. मुलांसमोर शिक्षकांची दमछाक होताना दिसत आहेत. शिक्षकांकडून सातत्याने मुलांना नियमांचे पालन करण्याबाबत सांगण्यात येत आहे. परंतु, ऐकतील ती मुले कुठली.
शाळा सुरू झाल्याने, पालकांनी समाधान व्यक्त केले. शाळेत मुलांची लक्षणीय उपस्थिती आहे. शिक्षकही एकाग्रतेने अध्यापन करीत आहेत. परंतु कोरोनाचे नियम पालन करण्यासाठी मुलांच्या मागे लागावे लागते. थोडीबहुत कसरत करावी लागत आहे.
- संतोष झामरे, शिक्षक, जि. प. शाळा किनखेड
शाळांकडून शासन नियमांचे पूर्ण पालन होत आहे. परंतु, लहान मुलांकडून नियमांचे पालन करून घेताना, कसरत करावी लागत आहे. मास्कचा वापर, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करण्यासाठी मुलांच्या सातत्याने मागे राहावे लागते.
- प्रकाश घाटोळे, शिक्षक, जागृती विद्यालय
शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात येते. लहान मुलांकडून बऱ्याचदा दुर्लक्ष होते. परंतु, त्यासाठी मुलांना वारंवार मास्कचा वापर, सॅनिटायझर, फिजिकल डिस्टन्सिंगचा वापर करण्यासाठी सांगावे लागते. शिक्षकही मुलांवर लक्ष ठेवून असतात.
- आनंद साधू, मुख्याध्यापक, महाराष्ट्र माध्यमिक शाळा