जिल्ह्यातील १०५३ अंगणवाड्यांमध्ये नाही नळजोडणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:25 AM2021-02-27T04:25:25+5:302021-02-27T04:25:25+5:30
अंगणवाड्यांमध्ये ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुले व मुलींना पूर्वशालेय शिक्षणाचे धडे दिल्या जातात. अंगणवाड्यांतील मुला मुलींना शुध्द पिण्याचे ...
अंगणवाड्यांमध्ये ३ ते ६ वर्षे वयोगटातील मुले व मुलींना पूर्वशालेय शिक्षणाचे धडे दिल्या जातात. अंगणवाड्यांतील मुला मुलींना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे. जिल्ह्यात १ हजार ३९० अंगणवाड्या असून त्यामध्ये १ लाख २ हजार २४५ मुले व मुली पूर्वशालेय शिक्षण घेत आहेत. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सद्यस्थितीत अंगणवाड्यांमधील मुलांना शिकविण्याचे काम बंद आहे. परंतू जिल्ह्यातील १ हजार ३९० अंगणवाड्यांपैकी केवळ ३३७ अंगणवाड्यांमध्ये नळजोडणीची सुविधा उपलब्ध असून, उर्वरित १ हजार ५३ अंगणवाड्यांमध्ये नळजोडणीची सुविधा उपलब्ध नाही. नळजोडणी उपलब्ध नसलेल्या अंगणवाड्यांमधील मुला, मुलींंच्या पिण्याच्या पाण्यासाठी हातपंप व जिल्हा परिषद शाळांमधील पाण्याचा वापर करण्यात येतो. त्यानुषंगाने जिल्ह्यातील नळजोडणी उपलब्ध नसलेल्या १ हजार ५३ अंगणवाड्यांमध्ये उन्हाळा सुरु होण्यापूर्वीच जलसंकटाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने, या अंगणवाड्यांमधील मुला मुलींसाठी शुध्द पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्याचा प्रश्न एेरणीवर आला आहे.
जिल्ह्यात तालुकानिहाय अंगणवाड्यांची संख्या
तालुका अंगणवाड्या
अकोला ३०८
बार्शिटाकळी १८३
अकोट २२१
तेल्हारा १७६
बाळापूर १७२
मूर्तिजापूर १९०
पातूर १४०
....................................................
एकूण १३९०
नळजोडणी नसलेल्या अंगणवाड्या
१०५३
जिल्हयातील ३३७ अंगणवाड्यांमध्ये नळजोडणीची सुविधा उपलब्ध आहे. उर्वरित १ हजार ५३ अंगणवाड्यांमध्ये जलजीवन मिशन अंतर्गत लवकरच नळजोडणीची सुविधा उपलब्ध होणार आहे.
विलास मरसाळे
उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण), जिल्हा परिषद, अकोला.