मिरवणूक नाही; गणपती विसर्जन आज साधेपणाने !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:20 AM2021-09-19T04:20:50+5:302021-09-19T04:20:50+5:30
अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रविवार, १९ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन साधेपणाने करण्यात येणार आहे. शासन आदेशानुसार कुठेही विसर्जन ...
अकोला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात रविवार, १९ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जन साधेपणाने करण्यात येणार आहे. शासन आदेशानुसार कुठेही विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार नसून, अकोला शहरातील विसर्जन मिरवणूक मार्गावर रविवारी सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे.
कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही, यासाठी शासनाच्या आदेशानुसार यंदाही गणपती विसर्जन साधेपणाने करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्ह्यात कुठेही गणपती विसर्जन मिरणूक काढण्यात येणार नसून, साधेपणाने गणपती विसर्जन करण्यात येणार आहे. अकोला शहरात गणपती विसर्जन मार्गावर गर्दी होऊ नये, यासाठी शहरातील जयहिंद चौक ते सिटी कोतवाली जवळील गणेश घाटपर्यंत विसर्जन मिरवणूक मार्गावर रविवारी सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत जमावबंदी लागू करण्यात येत असल्याचा आदेश अकोल्याचे उपविभागीय दंडाधिकारी डाॅ. नीलेश अपार यांनी दिला. तसेच जिल्ह्यात गणपती विसर्जन साधेपणाने करण्यात येणार असून, पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याशिवाय आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हयातील संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत, असे निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी सांगीतले.
मिरवणूक मार्गावर कार्यकारी
दंडाधिकाऱ्यांच्या नेमणुका!
गणपती विसर्जन मिरवणूक राहणार नाही; मात्र अकोला शहरातील जयहिंद चौक ते सिटी कोतवाली जवळील गणेश घाटापर्यंतच्या विसर्जन मिरवणूक मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामध्ये तहसीलदार व नायब तहसीलदार आणि इतर संवर्गातील महसूल कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे उपविभागीय अधिकारी डाॅ. नीलेश अपार यांनी सांगितले.