महिनाभरानंतरही ‘जीएमसी’च्या ‘स्ट्रक्चरल ऑडिट’चा अहवाल नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2019 02:01 PM2019-12-09T14:01:59+5:302019-12-09T14:02:08+5:30
सार्वजनिक बांधकाम विभागाला स्ट्रक्चरल आॅडिटचा अधिकृत अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
अकोला : गत महिन्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. तपासणी दरम्यान यातील पाच इमारती धोकादायक असल्याचे सांगण्यात आले होते; मात्र महिना होऊनही स्ट्रक्चरल आॅडिटचा अंतिम अहवाल आला नाही.
सर्वोपचार रुग्णालयातील ९२ वर्षे जुन्या इमारतीसह इतर चार इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिट ३ नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत ‘व्हीएनआयटी’मार्फत इमारतीचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले होते. त्यावेळी ‘व्हीएनआयटी’चे प्रा. इंगळे आणि प्रा. व्यवहारे यांनी पाचही इमारती धोकादायक स्थितीत असल्याचे स्पष्ट केले. या पाचही इमारती सर्वोपचार रुग्णालयाचा कणा असून, याच इमारतींमध्ये दररोज हजारो रुग्णांवर उपचार केला जातो. सार्वजनिक बांधकाम विभागाला स्ट्रक्चरल आॅडिटचा अधिकृत अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
नव्या इमारतीचा प्रस्ताव रखडला!
सर्वोपचार रुग्णालयातील धोकादायक इमारतीच्या ठिकाणी नव्या इमारतीचा प्रस्ताव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातर्फे तयार करण्यात आला आहे; परंतु व्हीएनआयटीमार्फत करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल आॅडिटचा अंतिम अहवाल अद्याप प्राप्त न झाल्याने नव्या इमारतीचा प्रस्ताव सादर करणे शक्य नसल्याचे जीएमसी प्रशासनाचे म्हणणे आहे.