वर्तमानपत्रांसदर्भात कोणतेही निर्बंध नाहीत! - जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2020 11:09 AM2020-03-24T11:09:14+5:302020-03-24T11:09:26+5:30
खोटा संदेश पसरविणाऱ्या विरोधात सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही नोंदविण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कोरोनाच्या पृष्ठभूमीवर वृत्तपत्रांसदर्भात कोणतेही निर्बंध आणले नाही, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.
दोन दिवसांपूर्वी अकोला जिल्हाधिकारी यांच्या नावाने व जिल्हा माहिती कार्यालयाने प्रसारित केला आहे, असे भासवून एक खोटा संदेश मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. यामध्ये वृत्तपत्रांसदर्भात जिल्हाधिकारी यांनी निर्बंध आणले असल्याचे म्हटले होते; मात्र हा संदेश सपशेल खोटा असून, असा कुठलाही आदेश काढला नसल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनीच माध्यमांना दिली. विशेष म्हणजे असा खोटा संदेश पसरविणाऱ्या विरोधात सिटी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये तक्रारही नोंदविण्यात आली आहे.
बुधवारी माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी पापळकर यांनी कोरोनाच्या विरोधातील लढा हा सर्वांच्या साथीने व सहकार्याने लढायचा आहे, त्यामुळे खोटी माहिती व अफवा टाळण्याची गरज व्यक्त केली. वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनतेपर्यंत योग्य त्या सूचना जात असून, कोरोनाविरोधात जनजागृती करण्यासाठी वर्तमानपत्रांचे मोठे सहकार्य असल्याचे नमूद केले आहे. ते म्हणाले की सध्या लोकांपर्यंत खरी माहिती पोहोचली पाहिजे, घाबरून जाण्यापेक्षा काळजी घ्या, घराबाहेर पडू नका. कोरोनाच्या विरोधातील युद्ध आपल्याला जिंकायचे आहे, त्यामुळे खोट्या अफवांना बळी पडू नका आणि कोणी पसरवित असेल तर त्यांच्या विरोधात कडक कारवाई केली जाईल. दरम्यान, या खोट्या संदेशाविरोधात जिल्हा माहिती अधिकारी डॉ. मिलिंद दुसाने यांनी सिटी कोतवाली परिसरात तक्रार नोंदविली असून, हा संदेश कोणी पसरविला, याचा शोध सुरू झाला आहे.