रस्त्याची दुरुस्ती नाहीच; उड्डाणपुलाचे काम अकोलेकरांच्या जीवावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 03:01 PM2019-10-30T15:01:35+5:302019-10-30T15:01:42+5:30
खदान पोलीस ठाणे ते थेट रेल्वे स्टेशनपर्यंतचा रस्ता अकोलेकरांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे.
अकोला: शहरातील निर्माणाधिन उड्डाणपुलाचे काम सर्वसामान्य अकोलेकरांच्या जीवावर उठले आहे. २४ आॅक्टोबर रोजी मतमोजणीच्या दिवशी भाजपचे लोकप्रतिनिधी स्वत:च्या राजकीय भवितव्याची चिंता करीत असताना उड्डाणपुलालगतच्या रस्ता दुरुस्तीला ठेंगा दाखवणाºया कंत्राटदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहरातील एका तरुणाचा ट्रकखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतरही कंत्राटदाराने रस्ता दुरुस्तीला सुरुवात केली नाही आणि भाजप लोकप्रतिनिधींनासुद्धा या गंभीर प्रकाराची दखल घ्यावीशी वाटली नसल्याने उड्डाणपुलाचे काम आणखी किती निष्पाप अकोलेकरांचा बळी घेणार, असा सवाल उपस्थित झाला आहे.
प्रशस्त रस्ते, उड्डाणपुलामुळे शहराच्या विकासाला चालना मिळते, यात दुमत नाही; परंतु विकास कामांना प्रारंभ करण्यापूर्वी नियोजन आणि पर्यायी उपाययोजनांची काटेक ोरपणे अंमलबजावणी आवश्यक ठरते. शहरातील विकास कामांचा भाजपच्या स्तरावर गवगवा केला जात असला तरी प्रत्यक्षात पर्यायी उपाययोजनांकडे साफ कानाडोळा केला जात असल्याची परिस्थिती आहे. प्र्रशस्त रस्ते निर्मितीच्या नावाखाली शहरात एकाच वेळी सर्व मुख्य रस्त्यांचे खोदकाम केल्या जात असल्यामुळे वाहतूक व्यवस्था पार कोलमडून गेली आहे. खदान पोलीस स्टेशन ते अशोक वाटिका ते रेल्वे स्टेशनपर्यंत उड्डाणपुलासाठी खोदकाम केल्या जात आहे. खोदकामादरम्यान मुख्य रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्याची परिस्थिती आहे. उड्डाणपुलाचे काम करणाºया कंत्राटदारानेच रस्त्याची दुरुस्ती करणे भाग असून, निविदेतही रस्ता दुरुस्तीचा समावेश आहे. मागील काही महिन्यांपासून उड्डाणपुलासाठी खोदकाम करणाºया कंत्राटदाराने पैसे वाचविण्याच्या मानसिकतेतून रस्ता दुरुस्तीकडे सपशेल पाठ फिरवल्यामुळे खदान पोलीस ठाणे ते थेट रेल्वे स्टेशनपर्यंतचा रस्ता अकोलेकरांसाठी जीवघेणा ठरू लागला आहे.
वजनदार ‘सेठ’मुळे भाजपची चुप्पी
शहराचा विकास व्हावा, या उदात्त उद्देशातून आमदार गोवर्धन शर्मा यांनी उड्डाणपुलासाठी शासनाकडे रेटा लावून धरला होता. त्यानुषंगाने शासनाने १६७ कोटी रुपये मंजूर केले. उड्डाणपुलाचे काम नागपूर येथील कंपनीमार्फत केल्या जात असले तरी प्रत्यक्षात भाजपमधील स्थानिक वजनदार ‘सेठ’ची भागिदारी असल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेतृत्वाकडून रस्ता दुरुस्तीसाठी प्रत्यक्षात पुढाकार घेतला जाईल का, याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनेचा इशारा; तरीही निकृष्ट काम
खदान पोलीस स्टेशन ते रेल्वे स्टेशनपर्यंतच्या मार्गावर ठिकठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. निर्माणाधिन उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूकडील रस्त्याची चाळण झाल्यामुळे अकोलेकरांना वाहन चालविणे मुश्कील झाले आहे. ही बाब लक्षात घेता शिवसेनेचे शहर प्रमुख राजेश मिश्रा यांनी मध्यंतरी संबंधित कंत्राटदाराला रस्त्याची दुरुस्ती करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर थातूरमातूर डांबराचा निकृष्ट थर अंथरण्यात आल्याचे समोर आले.
कंत्राटदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहराच्या काँग्रेस नगरमधील एका निष्पाप तरुणाचा बळी गेला आहे. रस्त्याच्या दुरुस्तीला सुरुवात न केल्यास उड्डाणपुलाचे काम बंद केले जाईल.
-राजेश मिश्रा शहर प्रमुख शिवसेना