सुरक्षा साधने नाहीत; जीव धोक्यात घालून सफाई कर्मचारी निभावतात कर्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 07:59 PM2021-05-13T19:59:38+5:302021-05-13T20:00:05+5:30
Akola News : मनपा आयुक्त निमा अरोरा यांनी लक्ष देण्याची अपेक्षा आहे.
अकोला : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संपूर्ण शहर होरपळत असताना महापालिकेचे सफाई कर्मचारी कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय जीव धोक्यात घालून कर्तव्य निभावत आहेत. ना हातमोजे, ना तोंडाला मास्क, ना पायात गम बूट अशा स्थितीत सफाई कर्मचारी शहरवासीयांची घाण साफ करीत असताना प्रशासनाकडून होणारे दुर्लक्ष वेदनादायी ठरत आहे. याकडे मनपा आयुक्त निमा अरोरा यांनी लक्ष देण्याची अपेक्षा वर्तविली जात आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत घरोघरी कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. साहजिकच शहराच्या कानाकोपऱ्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव झाला असताना नागरिक त्यांनी वापरलेले साहित्य उघड्यावर, सर्व्हिस लाईनमध्ये किंवा नालीत फेकून देतात. अर्थात ही घाण साफ करण्यासाठी महापालिकेच्या आस्थापनेवरील, तसेच खासगी तत्त्वावरील सफाई कर्मचारी सरसावल्याचे दिसून येते. मनपाच्या आस्थापनेवरील कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर, हातमोजे, मास्क व गम बूट, आदी सुरक्षा साधनांची पूर्तता करावी यासाठी मनपातील सफाई कर्मचारी संघटनेच्यावतीने सातत्याने प्रशासनाकडे मागणी केली जाते. परंतु, त्यांच्या मागण्यांना सोयीनुसार बाजूला सारल्या जात असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे कोणत्याही सुरक्षा साधनांशिवाय जीव धोक्यात घालून सफाई कर्मचारी निमूटपणे कर्तव्य निभावत असल्याचे दिसून येते.
सकाळी सात वाजता सफाई कर्मचारी कर्तव्यावर!
जिवाची लाही लाही करणाऱ्या उन्हाची तीव्रता लक्षात घेता साफसफाईच्या कामांना सकाळी सात वाजता प्रारंभ केला जात आहे. हजेरी पुस्तिकेवर स्वाक्षरी करून सफाई कर्मचारी कर्तव्य बजावत असल्याचे गुरुवारी पाहावयास मिळाले.
मनपा आयुक्तांच्या भूमिकेकडे लक्ष
मनपाच्या आस्थापनेवरील, तसेच खासगी तत्त्वावरील सफाई कर्मचाऱ्यांना प्रशासनाच्या वतीने कोणतीही सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्यात आली नाहीत. त्यामुळे दैनंदिन स्वच्छतेची कामे करणारे सफाई कर्मचारी कोरोनाचे वाहक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही बाब लक्षात घेता मनपा आयुक्त निमा अरोरा सफाई कर्मचाऱ्यांच्या हितासाठी कोणता निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
कोरोनाच्या काळात स्वच्छतेची कामे करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांना सुरक्षा साधने उपलब्ध करून द्यावीत, यासाठी प्रशासनासह सत्ताधारी पक्षाकडे अनेकदा मागणी केली आहे. या मागणीची पूर्तता होत नसल्याची खंत आहे.
- पी. बी. भातकुले अध्यक्ष, सफाई कर्मचारी संघटना मनपा
सफाई कर्मचाऱ्यांच्या हिताकडे मनपा प्रशासनाकडून कानाडोळा केला जात आहे. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
- अनुप खरारे पदाधिकारी, सफाई कर्मचारी संघटना मनपा