ना शाळा, ना परीक्षा, तरीही अडीच लाख विद्यार्थी पास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 10:39 AM2021-06-22T10:39:51+5:302021-06-22T10:40:04+5:30
Educaton Sector News : अकोला जिल्ह्यातील दोन लाख ३५ हजार २१३ विद्यार्थ्यांना ना शाळा, ना परीक्षा देता, पास करण्यात आले.
- नितीन गव्हाळे
अकोला : कोरोना विषाणूचा सातत्याने प्रादुर्भाव वाढत आहे. दररोज कोरोना बाधित रूग्णांची संख्या वाढत आहे. दररोज कोरोनामुळे मृत्यू होत आहे. त्यामुळे राज्य शासनाने पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे अकोला जिल्ह्यातील दोन लाख ३५ हजार २१३ विद्यार्थ्यांना ना शाळा, ना परीक्षा देता, पास करण्यात आले. त्यासाठी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून त्यांना पुढील वर्गात ढकलण्यात आले.
राज्यात कोरोनाचे संकट अधिकच गतीने वाढत आहे. रूग्ण वाढत आहे. राज्य शासनाने संचारबंदी लागू केली होती. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत पाठवून परीक्षा घेणे, आरोग्याच्या दृष्टिकोनातून धोक्याचे आहे. त्यामुळे शासनाने इयत्ता पहिली ते नववी वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढील वर्गात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पालकांसोबतच शिक्षकांना सुद्धा दिलासा मिळाला. परीक्षा झाली असती तर विद्यार्थ्यांनी दररोज पेपरसाठी शाळेत सोडून देण्याचे काम पालकांना करावे लागले असते. तसेच मुख्याध्यापक, शिक्षकांनाही मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना कराव्या लागणार होत्या. शिक्षकांनाही विषयनिहाय पेपर तपासावे लागणार होते. परंतु आता परीक्षाच रद्द करण्यात पेपर तपासण्याच्या त्रासातून शिक्षकांची मुक्तताच झाली.
पहिली ते आठवीची तालुकानिहाय विद्यार्थी
अकोला पं.स.- ९१६७४
अकोट- ३४४५५
बाळापूर- २५५२४
बार्शीटाकळी- १७०११
मूर्तिजापूर- २००६३
पातूर- १७१६५
तेल्हारा- २१८४२
मनपा क्षेत्र- ७४७९
.....................................
एकूण- २३५२१३
जिल्ह्यातील शाळा- १८६८
जि. प. शाळा- ९१२
अनुदानित शाळा- ६७४
विनाअनुदानित शाळा- २८२
ऑनलाइन शिक्षण....
फायदे
कोरोनाचा प्रादुर्भावामुळे परीक्षा रद्द केल्यामुळे विद्यार्थी कोरोनाच्या संसर्गापासून सुरक्षित राहिले. ऑनलाइन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न केले. परीक्षा न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर फारसा परिणाम झालेला नाही.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून परीक्षा न घेणे योग्यच ठरले. विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणाची गोडी लागली. परीक्षा घेतल्या असत्या तर विद्यार्थ्यांना पेपर देण्यासाठी शाळेत यावे लागले. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने, विद्यार्थ्यांच्या जीवितालाही धोका होता. परीक्षा न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम झाला नाही. ऑनलाईन शिक्षण घेताना, अनेक तांत्रिक अडचणींना सामना करावा लागला.
ग्रामीण भागात अनेक शैक्षणिक संस्था, युवक, युवती मुलांच्या शिक्षणासाठी पुढे सरसावले
तोटे....
ऑनलाइन शिक्षणामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले. ग्रामीण भागासह डोंगराळ भागात इंटरनेट चालत नसल्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता आले. शाळा बंद, शिक्षकांचे मार्गदर्शन नाही. अशा परिस्थितीत त्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागले.
नेटची सुविधा, अनेक विद्यार्थ्यांकडे पालकांकडे स्मार्ट फोन नसल्यामुळे दैनंदिन अभ्यास विद्यार्थ्यांना करता आला नाही. एकंदरित ग्रामीण विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाल्याचे दिसून आले.
शहरात मात्र, विद्यार्थ्यांच्या पालकांकडे स्मार्ट फोन, टॅब, लॅपटॉप आदी सुविधा असल्यामुळे त्यांना ऑनलाइन शिक्षणाचा लाभ घेता आला. शहरात नेटचा फारसा त्रास झाला नाही. शाळांकडून विद्यार्थ्यांना दररोज गृहपाठ, पेपर देण्यात येत होते. यात अडचणी आल्या असल्या तरी शहरी भागातील विद्यार्थ्यांचे ग्रामीण विद्यार्थ्यांच्या तुलनेने फारसे शैक्षणिक नुकसान झाले नाही.