१५ वर्षांपासून शिक्षक नाहीत, मग डीएडचा डिप्लोमा मिळतो तरी कसा?
By नितिन गव्हाळे | Published: October 6, 2024 05:22 PM2024-10-06T17:22:38+5:302024-10-06T17:23:05+5:30
आठ शिक्षकांचे विषय एकच शिक्षक शिकवतो, महिला अध्यापक विद्यालयातील चित्र
अकोला: शासकीय अध्यापक विद्यालयातून पिढ्या घडविणारे शिक्षक तयार होतात. परंतु याच अध्यापक विद्यालयाची परिस्थिती विदारक झाली असेल तर काय म्हणावे? गत १५ वर्षांपासून येथील शासकीय महिला अध्यापक विद्यालयात शिक्षकच नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. केवळ एकच शिक्षक आठ शिक्षकांच्या विषय शिकवित असल्याचेही समोर आले आहे. शिक्षकांविना सुरू असलेली महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची एकमेव शाळा....असाच उल्लेख याठिकाणी करावा लागत आहे. अशी विदारक परिस्थिती डीएड शिक्षणाची झाली आहे.
अकोला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने शिक्षण उपसंचालक अमरावती व इतर वरिष्ठ कार्यालयांना शिक्षक मिळण्याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार केला. मात्र जवळपास १५ वर्षांपासून येथे शिक्षक नसतानाही विद्यार्थ्यांना डीएडचा डिप्लोमा कसा दिला जातोय? असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्यास्थितीत विद्यालयात प्रथम वर्षाला १४ तर द्वितीय वर्षाला १० विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत. शिक्षक नसलेल्या अध्यापक विद्यालयात डिप्लोमा घेत असल्याची खंत येथील विद्यार्थिनी बोलून दाखवतात. दोन वर्षांत एकही प्रात्यक्षिक झाले नाही. ना कुठल्या शाळेत गेले, ना मुलांना शिकवले. तरीही डिप्लोमा मिळाला. अशी एकंदरीत अकोल्यातील शासकीय महिला अध्यापक विद्यालयातील परिस्थिती आहे. शिक्षणाप्रती शासनाची किती ही उदासीनता आहे. हे यातून अधाेरेखित होत आहे. शासकीय महिला अध्यापक विद्यालयात एक मुख्याध्यापक, ८ शिक्षक, २ कनिष्ठ लिपिक, ५ शिपाई, १ चौकीदार अशा एकूण १७ पदांची आवश्यकता आहे, मात्र या अध्यापक विद्यालयात लिपिक, शिपाई आणि चौकीदार ही पदे भरण्यात आली आहेत, तर मुख्याध्याक व शिक्षकांची १२ पदे रिक्त आहेत.
पूर्ण विषय शिकवणारा शिक्षक
अकोला जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेने अध्यापक विद्यालयात तात्पुरत्या स्वरुपात व्याख्यात्याची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे, हा एकच शिक्षक प्रथम आणि द्वितीय वर्षाला शिकवतो. आठ शिक्षकांचे काम एकच व्यक्ती करत असल्याने, राज्य शासन शिक्षणाला किती महत्त्व देत आहे, हे दिसून येते.
आम्हाला शिकायचे आहे, मात्र....
अध्यापक विद्यालयातील विद्यार्थिनींनी, आम्हाला शिकवायला शिक्षक नसल्याची खंत व्यक्त केली. या ठिकाणी लवकर शिक्षक उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंती केली. आम्हाला शिकायचे आहे. मात्र येथे एकही शिक्षक नाही.