अकोला जिल्ह्यात २० टक्के शिक्षकांचे ना लसीकरण, ना कोरोना टेस्टिंग!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 10:52 AM2021-07-18T10:52:06+5:302021-07-18T10:54:46+5:30
No vaccination, no corona testing of teachers : शाळा सुरू होऊनही शिक्षकांनी कोरोना लसीकरण किंवा कोरोना टेस्टिंग केले नाही.
अकोला : कोरोनाचा प्रभाव कमी झाला असून, कोरोना रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे. त्यामुळे शासनाने कोरोनामुक्त गावांमध्ये आठवी ते बारावीपर्यंत शाळा सुरू करण्यास परवानगी दिली. १४ जुलैपासून जिल्ह्यातील आठवीचे वर्ग सुरू झाले आहेत. परंतु, जिल्ह्यात अद्यापही २० टक्के शिक्षकांनी लसीकरणच काय, कोरोनाची टेस्टिंगसुद्धा केली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. शाळा सुरू होऊनही शिक्षकांनी कोरोना लसीकरण किंवा कोरोना टेस्टिंग केले नाही. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यास कोण जबाबदार राहील, असा प्रश्न निर्माण झाला आहे. काेरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, कोरोना अद्याप संपलेला नाही. कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे पालकांमध्येसुद्धा मुलांना शाळेत पाठवायचे की नाही, याबाबत संभ्रम आहे. शिक्षकांनी शाळेत जाण्यापूर्वी कोरोना लसीकरण किंवा टेस्टिंग करणे गरजेचे आहे. असे शिक्षण विभागाने बजावले होते. परंतु, त्याकडे अनेक शिक्षकांनी दुर्लक्ष केले. एवढेच नाही तर मुख्याध्यापकांनीसुद्धा शिक्षकांच्या या कृतीकडे कानाडोळा केल्याचे दिसून आले. अनेक शिक्षकांना मुख्याध्यापकांनी रुजू करून घेतले. विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी कोरोना लसीकरण व टेस्टिंग करून घेण्याची गरज आहे.
पहिल्या दिवशी ३२१ शाळा सुरू
शासनाने कोरोनामुक्त गावांमध्ये इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा, महाविद्यालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार, अकोला जिल्ह्यातील सातही तालुक्यांमध्ये १४ जुलै रोजी ३२१ शाळा सुरू झाल्या आहेत.
पहिल्याच दिवशी ४१ हजार २३४ विद्यार्थ्यांचे एक साथ नमस्ते...
शाळेच्या पहिल्याच दिवशी आठवी ते बारावीतील विद्यार्थ्यांनी शाळा प्रवेशाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी शाळा, महाविद्यालयांकडून विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन व फुलांची उधळण करून शिक्षकांनी स्वागत केले. शाळा सुरू झाल्यामुळे शिक्षक आणि विद्यार्थी उत्साहात दिसत होते. पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील ४१ हजार २३४ विद्यार्थ्यांनी एक साथ नमस्ते गुरुजी केले.
२५४४- आठवी ते बारावीपर्यंतचे एकूण शिक्षक
१०२६- पहिला डोस झालेले शिक्षक
८७२-दुसरा डोस झालेले शिक्षक
४४२-पहिल्या दिवशी टेस्टिंग केलेले शिक्षक
२०४ -ना टेस्टिंग ना लसीकरण
एकाच दिवसात चाचणी करायची कशी?
शाळा सुरू झाल्या. याचे समाधान झाले. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी लसीकरण व कोरोना टेस्टिंग करणे आवश्यक आहेत. परंतु, एका दिवसात कोरोना चाचणी करायची कशी? चाचणी करायला गेलो तर शिक्षकांना प्रतीक्षा करावी लागते. शिक्षकांसाठी स्वतंत्र चाचणी व लसीकरणाची व्यवस्था करावी.
-सतीश वरोकार, शिक्षक जि.प. शाळा
विद्यार्थ्यांसह शाळा सुरू झाल्या, याचा आनंद आहे. दीड वर्षांच्या कालावधीनंतर विद्यार्थी शाळेत आले. त्यांची सुरक्षितता व खबरदारी महत्त्वाची आहे. त्यासाठी शिक्षकांनी कोरोना टेस्टिंग व लसीकरण करायलाच हवे. परंतु, त्यात काही अडचणी आहेत. त्या दूर केल्या पाहिजेत.
-पुंडलिक भदे, मुख्याध्यापक, जि.प. शाळा कट्यार
शाळा उघडल्या असून, शिक्षक व विद्यार्थी शाळेत जात आहेत. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी कोरोना चाचणी व लसीकरण करून घेणे महत्त्वाचे आहे. ज्या शिक्षकांनी चाचणी व लसीकरण केले नसेल, त्यांनी प्राधान्याने करून घ्यावे.
-दिलीप तायडे, शिक्षणाधिकारी