लसीकरण केंद्रात लस मिळेना; ज्येष्ठ नागरिकांची कुचंबणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:29 AM2021-05-05T04:29:13+5:302021-05-05T04:29:13+5:30
अकोला : राज्य शासनाकडून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठी लस उपलब्ध करून दिली जात आहे. तसेच दुसरीकडे ज्येष्ठ ...
अकोला : राज्य शासनाकडून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठी लस उपलब्ध करून दिली जात आहे. तसेच दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्र शासनाकडून लसीचा पुरवठा केला जात आहे. अर्थात, यामुळे लसीचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता धूसर झाली असतानाच आता ज्येष्ठ नागरिकांसाठी मनपाच्या अनेक लसीकरण केंद्रांमध्ये लसीचा तुटवडा निर्माण झाल्याची माहिती आहे. यामुळे सोमवारी शहरातील काही लसीकरण केंद्रे बंद असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची कुचंबणा झाल्याचा प्रकार समोर आला.
केंद्र शासनाने कोरोना विषाणूला पायबंद घालण्यासाठी मार्च महिन्यात ६० वर्षांपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांसाठी लस उपलब्ध करून दिली. त्यानंतर पंचेचाळीस वर्षांपेक्षा अधिक नागरिकांसाठीही लसीकरणाला प्रारंभ करण्यात आला. केंद्र व शासनाच्या निर्देशानुसार महापालिका प्रशासनाने शहरातील विविध केंद्रांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लस उपलब्ध करून दिली. ही प्रक्रिया सुरू असतानाच आता केंद्र शासनाने १ मे पासून १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांसाठीही लसीकरण मोहिमेला प्रारंभ केला आहे. दरम्यान, यामुळे लसीकरण केंद्रांमध्ये गर्दी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता महापालिकेच्या स्तरावर ठराविक केंद्रांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी, तर इतर पाच केंद्रांमध्ये ४४ पर्यंतच्या वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू केली. दरम्यान, या केंद्रांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी लस उपलब्ध असल्याची माहिती मनपाकडून दिली जात आहे. नेमके त्याच केंद्रांमध्ये सोमवारी लस उपलब्ध नसल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये हरिहर पेठ येथील मनपा शाळा क्रमांक १९ चा समावेश आहे. यामुळे भर उन्हात लस घेण्यासाठी गेलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मानसिक त्रास सहन करावा लागला.
लस उपलब्ध नसल्यास माहिती द्या!
शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी राखीव असलेल्या लसीकरण केंद्रांमध्ये लस उपलब्ध नसल्यास अशा केंद्रांची माहिती मनपाने जाहीर करण्याची गरज निर्माण झाली आहे. जेणेकरून ज्येष्ठ नागरिक घराबाहेर न निघाल्यास कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालणे शक्य होईल.
मनपाच्या नियोजनाकडे लक्ष
महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या एकूण नऊ लसीकरण केंद्रांमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच ४४ वयापर्यंतच्या नागरिकांसाठी लस उपलब्ध करून दिली जात आहे. दरम्यान, गर्दी टाळण्याच्या उद्देशातून महापालिकेने यातील पाच लसीकरण केंद्रांमध्ये केवळ १८ ते ४४ या वयोगटातील नागरिकांना लस देण्याचे नियोजन केले आहे. उर्वरित चार लसीकरण केंद्रांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना लस उपलब्ध होणे गरजेचे असताना तसे होत नसल्याचे समोर आले आहे. यावर मनपा प्रशासन कशा पद्धतीने नियोजन करते याकडे सुज्ञ अकोलेकरांचे लक्ष लागले आहे.