डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याची विल्हेवाट नाहीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:20 AM2021-02-24T04:20:56+5:302021-02-24T04:20:56+5:30
अकोला: नायगाव परिसरातील ‘डम्पिंग ग्राऊंड’वर कचऱ्याचे भलेमाेठे ढीग साचले आहेत. शहरातून कचरा घेऊन जाणाऱ्या वाहनांना या ठिकाणी जागाच ...
अकोला: नायगाव परिसरातील ‘डम्पिंग ग्राऊंड’वर कचऱ्याचे भलेमाेठे ढीग साचले आहेत. शहरातून कचरा घेऊन जाणाऱ्या वाहनांना या ठिकाणी जागाच शिल्लक नसल्यामुळे कचरा टाकण्यास अडचण निर्माण हाेत आहे. या ठिकाणी साठवणूक केल्या जाणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्याचे मंगळवारी ‘लाेकमत’ने केलेल्या पाहणीत आढळून आले.
नायगाव परिसरातील महापालिकेच्या मालकीच्या सुमारे ११ एकर जमिनीवर शहरातील कचऱ्याची साठवणूक केली जाते. मागील काही वर्षांपासून डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवर अतिक्रमकांनी कब्जा केल्याचे चित्र आहे. अशा स्थितीत साठवणूक केल्या जाणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया होत नसल्यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. परिणामी कचरा साठवणुकीसाठी जागा शिल्लक नाही. महापालिकेच्या १२० घंटागाड्यांमार्फत घरोघरी जाऊन कचरा जमा केला जातो. हा कचरा डम्पिंग ग्राऊंडवर घेऊन जाणाऱ्या वाहनचालकांना परिसरातील नागरिकांकडून दमदाट्या, धमक्या व शिवीगाळ करण्याचे प्रकार होतात. घंटागाडी चालकांना होणारा त्रास पाहता यातील काही चालकांनी शहरात जागा दिसेल त्या ठिकाणी कचरा टाकण्यास सुरुवात केली आहे. यामुळे शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून येत आहे. यामुळे विविध साथराेगांनी डाेके वर काढले आहे.
प्रक्रिया नसल्याने साचला ढीग
मनपाचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने यांच्या कालावधीत एका स्वयंसेवी संस्थेने कचऱ्यावर प्रक्रिया सुरू केली हाेती. कालांतराने हा प्रयाेग अपयशी ठरल्याचे समाेर आले. तेव्हापासून कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम ठप्प झाले आहे.
पाेकलेनद्वारे थातूरमातूर काम
डंम्पिंग ग्राऊंडवर साठवणूक केल्या जाणाऱ्या कचऱ्याचे ढीग लावण्यासाठी मनपा प्रशासनाने भाडेतत्त्वावर पाेकलेन मशीन घेतली आहे. या मशीनद्वारे कचऱ्याचे केवळ ढीग लावण्याचे थातूरमातूर काम सुरू असल्याचे पाहणीत आढळून आले.
आयुक्तांनी ताेडगा काढण्याची गरज
कचऱ्यावर प्रक्रिया केली जात नसल्याने नायगावमध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. रहिवासी वस्तीतील जलस्रोत दूषित झाले असून हातपंप, सबमर्सिबल पंपांद्वारे दूषित पाणीपुरवठा हाेत आहे. त्यामुळे नागरिकांना मनपाच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत असून या भागात जलवाहिनीचा अभाव आहे. दुर्गंधीमुळे स्थानिकांना श्वसनाचे विकार जडले आहेत. त्यामुळे या समस्येवर मनपा आयुक्त निमा अराेरा यांनी ठाेस ताेडगा काढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
...फाेटाे टाेलेजी...