‘एचआयव्ही’मुक्तीसाठी ‘नो युवर स्टेटस’ मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2018 12:35 PM2018-12-01T12:35:52+5:302018-12-01T12:36:14+5:30
अकोला : जिल्हा एचआयव्हीमुक्त करण्यासाठी जागतिक एड्स दिनानिमित्त ‘नो युवर स्टेटस’ मोहीम राबविण्यात येत आहे.
अकोला : जिल्हा एचआयव्हीमुक्त करण्यासाठी जागतिक एड्स दिनानिमित्त ‘नो युवर स्टेटस’ मोहीम राबविण्यात येत आहे. यांतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, नागरिकांना एचआयव्ही स्टेटस जाणून घेता येईल.
जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई अंतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकातर्फे शनिवार, १ डिसेंबरपासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. उपक्रमांतर्गत जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातर्फे प्रभात फेरी, पथनाट्य, लोककला आणि पोस्टर स्पर्धांच्या माध्यमातून जनजागृतीसोबतच विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. आठवडाभर चालणाऱ्या या उपक्रमात अकोलेकरांना आपले एचआयव्ही स्टेटस माहिती करून घेता येणार आहे.
जिल्ह्याची स्थिती
गत वर्षभरात जिल्ह्यातील १ लाख ७ हजार ३०३ सामान्य रुग्णांची एचआयव्ही चाचणी करण्यात आली. त्यामध्ये ४१४ रुग्णांना एचआयव्ही असल्याचे निष्पन्न झाले, तसेच ४७ हजार ६८७ गरोदर मातांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १८ माता एचआयव्ही बाधित असून, त्यांना ‘एआरटी’ औषध देण्यात येत आहे.
येथे करता येईल तपासणी!
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, उप-जिल्हा रुग्णालय, जिल्हा स्री रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी रुग्णालयांतह रुग्णांची तपासणी व समुपदेशन नि:शुल्क केल्या जाते.
जिल्ह्यात एचआयव्हीचे प्रमाण शून्य करण्याच्या दृष्टिकोनातून विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यांतर्गत प्रत्येकाने आपली एचआयव्ही तपासणी करून आपले एचआयव्ही स्टेटस माहीत करून घ्यावे.
- डॉ. आरती कुलवाल, जिल्हा शल्यचिकित्सक.