आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत नोएल संघाला अजिंक्यपद
By admin | Published: January 29, 2015 11:38 PM2015-01-29T23:38:04+5:302015-01-29T23:38:04+5:30
अकोला येथे लोकमत आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा; अकाश हेडाऊ विजयाचा शिल्पकार.
अकोला: श्री नाना उजवणे मंडप कॉन्ट्रॅक्टर अँन्ड डेकोरेशन प्रस्तुत पहिल्या लोकमत आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद नोएल इंग्लिश हायस्कूलने पटकाविले. अकोला क्रिकेट क्लब मैदानावर गुरुवारी नोएल इंग्लिश हायस्कूल व माऊंट कारमेल हायस्कूल संघात सामना खेळला गेला. नोएलने ७ गडी राखून हा सामना जिंकला.
माऊंट कारमेलने प्रथम फलंदाजी करीत १५ षटकात ८ बाद १0१ धावा काढल्या. अभी बिलाला याने सर्वाधिक २८ धावा संघाच्या खात्यात जमा केल्या. प्रत्युत्तरात खेळताना नोएलच्या सलामीचा फलंदाज आकाश हेडाऊ याने चांगली सुरुवात केली. आकाशने ८ चौकारांसह नाबाद ५६ धावा काढून संघाला विजय मिळवून दिला. नोएल स्कूलने ३ गड्यांच्या मोबदल्यात १३ व्या षटकातच विजयी लक्ष्य पूर्ण करीत स्पर्धेच्या अजिंक्यपदावर ताबा घेतला. सामनावीर आकाश हेडाऊ ठरला.
*बक्षीस वितरण
सामना समाप्तीनंतर लगेच बक्षीस वितरण कार्यक्रम झाला. विशेष अतिथी अकोला महानगरपालिका उपायुक्त माधुरी मडावी होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह्यलोकमतह्णचे निवासी संपादक रवी टाले होते. प्रमुख अतिथी म्हणून श्री नाना उजवणे मंडप कॉन्ट्रॅक्टर अँन्ड डेकोरेशनचे संचालक तथा स्पर्धा प्रायोजक नाना उजवणे, पॅरामाऊंट स्पोर्टसचे संचालक जावेद अली, अकोला क्रिकेट क्लबचे कर्णधार भरत डिक्कर, माजी रणजीपटू नंदू गोरे, अशोक ढेरे, नोएल इंग्लिश स्कूलचे संचालक अनुल मनवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेता नोएल स्कूल व उपविजेता माऊंट कारमेल संघाला आकर्षक ह्यलोकमतह्ण करंडक देण्यात आला. जावेद अली यांच्यातर्फे मालिकावीर पुरस्कार व संकेत डिक्कर याला महाराष्ट्र संघात निवड झाल्याबद्दल बॅट देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेला सहयोग फायनान्स ग्रूप, पॅरामाऊंट स्पोटर्स, अकोला क्रिकेट क्लब यांचे सहकार्य लाभले.
*'लोकमत'चा चांगला उपक्रम
ह्यलोकमतह्ण समूहाने शहरातील नवोदित क्रिकेटपटूंसाठी स्पर्धेचे आयोजन केले, हा अत्यंत चांगला उपक्रम आहे. खेळाडू हा न्याय आणि अन्याय यामध्ये फरक जाणतो. या गुणामुळेच न्यायाने वागून एक उत्तम नागरिक म्हणून जगतो. अशा खेळाडूवृत्तीच्या नागरिकांची देशाला गरज असून, असे नागरिक खेळ स्पर्धांंमधून घडत असतात, असे मनपा उपायुक्त माधुरी मडावी यांनी मत व्यक्त केले.