अकोट शहरातील बोगस डॉक्टर निखिल गांधी पोलिसांना शरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2018 06:08 PM2018-09-14T18:08:54+5:302018-09-14T18:09:38+5:30
अकोट (अकोला) : शहरातील बहुचर्चित बोगस डॉक्टर प्रकरणातील आरोपी निखिल गांधी याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केल्यानंतर अखेर १४ सप्टेंबर रोजी तो पोलिसांसमोर हजर झाला.
अकोट (अकोला) : शहरातील बहुचर्चित बोगस डॉक्टर प्रकरणातील आरोपी निखिल गांधी याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केल्यानंतर अखेर १४ सप्टेंबर रोजी तो पोलिसांसमोर हजर झाला. अकोट शहर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.
अकोट शहर पोलीस स्टेशन अंतर्गत डॉ. श्याम केला यांच्या सिटी हॉस्पिटलची जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या आदेशावरून वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय कोलते यांच्या पथकाने तपासणी केली होती. त्यावेळी या ठिकाणी डॉ. निखिल गांधी नामक व्यक्तीकडे कोणत्याही प्रकारची वैद्यकीय पदवी व परवाना नसताना वैद्यकीय सेवा करताना आढळून आला, तसेच या हॉस्पिटलच्या नोंदणीचे कागदपत्रेसुद्धा आढळून आली नाहीत. या तपासणीचा अहवाल येण्यापूर्वी डॉ. श्याम केला यांनी डॉ. निखिल गांधी याने बोगस कागदपत्रे दाखवून आपली फसवणूक केल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून पोलिसांनी निखिल गांधीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर निखिल गांधी याने अटकपूर्व जामिनासाठी २४ आॅगस्ट रोजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. हा अर्ज न्यायालयाने फेटाळला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही अटकपूर्व जामीन फेटाळल्याने निखिल गांधी अखेर अकोट पोलिसांना शरण आला. पोलिसांनी त्याला अटक केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे करीत आहेत.