मनपा हद्दवाढीतील मालमत्ताधारकांना मिळणार अकृषक परवानगीची सनद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2019 01:07 PM2019-01-13T13:07:37+5:302019-01-13T13:07:54+5:30
अकोला : महानगरपालिका हद्दवाढीत समाविष्ट २२ गावांमधील ९८० मालमत्ताधारकांना जमीन अकृषक परवानगीची सनद देण्याची प्रक्रिया अकोला तहसील कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे.
अकोला : महानगरपालिका हद्दवाढीत समाविष्ट २२ गावांमधील ९८० मालमत्ताधारकांना जमीन अकृषक परवानगीची सनद देण्याची प्रक्रिया अकोला तहसील कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे.
अकोला महानगरपालिका हद्दवाढीमध्ये शहरानजीकची २२ गावे समाविष्ट करण्यात आली. हद्दवाढीच्या क्षेत्रात ५०६ सर्व्हे नंबरमध्ये कृषक जमीन असलेल्या ९८० मालकमत्ताधारकांना जमिनीची अकृषक परवानगी घेण्यासंदर्भात अकोला तहसील कार्यालयामार्फत सहा महिन्यांपूर्वी नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाकडून विकास परवानगी घेतलेल्या मालमत्ताधारकांना जमीन अकृषक परवानगीची सनद देण्याची प्रक्रिया अकोला तहसील कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे. मनपा हद्दवाढ क्षेत्रातील ९८० मालमत्ताधारकांपैकी ११ जानेवारीपर्यंत सहा मालमत्ताधारकांना त्यांच्या जमिनीची अकृषक परवानगीची सनद देण्यात आली आहे. मनपाकडून विकास परवानगी घेतल्याचा दस्तऐवज सादर केल्यानंतर उर्वरित मालमत्ताधारकांनाही जमीन अकृषक परवानगीची सनद तहसील कार्यालयामार्फत देण्यात येणार आहे.
हद्दवाढीमध्ये समाविष्ट अशी आहेत गावे!
मनपा हद्दवाढीमध्ये शहरानजीक असलेल्या खरप बु., शिलोडा, नायगाव, वाकापूर, अक्कलकोट, शहानवाजपूर, सुकापूर, तपलाबाद, निझामपूर, अकोली बु., अकोली खुर्द, हिंगणा म्हैसपूर, सोमठाणा, खडकी बु., मलकापूर, शिवणी, शिवर, उमरी, उमरखेड, डाबकी व शिवापूर इत्यादी गावांचा समावेश आहे. या गावांत कृषक जमिनी असलेल्या मालमत्ताधारकांनी मनपाकडून विकास परवानगी घेतल्यानंतर त्यांना जमीन अकृषक परवानगीची सनद देण्याचे काम तहसील कार्यालयाकडून सुरू करण्यात आले.
मनपा हद्दवाढ क्षेत्रातील ९८० मालमत्ताधारकांना जमीन अकृषक करण्याच्या नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. त्यापैकी ज्यांनी मनपाकडून विकास परवानगी घेतली आहे, अशा मालकमत्ताधारकांना जमीन अकृषक परवानगीची सनद देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत सहा मालमत्ताधारकांना जमीन अकृषक परवानगीची सनद देण्यात आली आहे.
-विजय लोखंडे,
तहसीलदार, अकोला.