मनपा शिक्षकांच्या बदलीचा पोळा फुटणार!
By admin | Published: June 6, 2017 12:52 AM2017-06-06T00:52:47+5:302017-06-06T00:52:47+5:30
आयुक्त लहाने यांचे निर्देश: उपायुक्त सरसावले
आशिष गावंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : एकाच शाळेवर मागील पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीपासून ठाण मांडलेल्या शिक्षकांची बदली करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी घेतला आहे. तसे निर्देश शिक्षण विभागाला दिले असले तरी या विभागाचा ढिम्म कारभार पाहता बदली प्रक्रियेसाठी उपायुक्त समाधान सोळंके सरसावल्याची माहिती आहे.
महापालिकेतील शिक्षण विभागाच्या भ्रष्ट कारभाराची संपूर्ण राज्यात ख्याती आहे. मागील दहा वर्षांच्या कालावधीत या विभागातील अधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या एकदा-दोनदा नव्हे तर प्रत्येक वर्षाला थातूर-मातूर बदली प्रक्रिया राबवली. शिक्षक संघटनेत दुकानदारी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. त्यावेळी पैसे मोजा आणि पाहिजे त्या शाळेत बदली करून घ्या, असा अघोषित फतवा शिक्षण विभागाने जारी केला होता. त्यामुळे शिक्षक संघटनेतील कुरघोडीच्या राजकारणाचा परिणाम आपसूकच विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर झाला. विद्यार्थ्यांची पटसंख्या कमालीची रोडावली.
शाळा इमारतींची दुरवस्था झाली. अशा स्थितीत शिक्षण विभागाला ताळ्यावर आणण्यासाठी महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी ठोस आणि दूरगामी निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. गतवर्षी एकाच शाळेवर १५ वर्षांपेक्षा जास्त काळ ठाण मांडून बसलेल्या ७० पेक्षा जास्त शिक्षकांची बदली करून शिक्षण विभागाच्या मनमानी कारभाराला हादरा दिला होता. यावर्षी आयुक्त लहाने यांनी ज्या शिक्षकांना एकाच शाळेवर पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असेल त्यांची इतर शाळेवर बदली करण्याचा निर्णय घेतला आहे. तसे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.
संघटनांचे पदाधिकारी हतबल
मनपा आयुक्तांच्या भूमिकेमुळे शिक्षण विभागाच्या माध्यमातून स्वत:चे उखळ पांढरे करून घेणाऱ्या शिक्षक संघटनेतील काही पदाधिकाऱ्यांच्या दुकानदारीला लगाम लागल्यामुळे सदर पदाधिकारी हतबल ठरल्याचे बोलल्या जात आहे. या विभागातील अधिकाऱ्यांच्या कामकाजावर आयुक्तांची करडी नजर असून, येत्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात उलटफेर होण्याचे संकेत आहेत.
पहिल्यांदाच बिंदू नामावली तयार
मनपाची स्थापन झाल्यापासून ते आजपर्यंत शिक्षकांची बिंदू नामावली तयार करण्यासाठी शिक्षण विभागाने कधीही पुढाकार घेतला नाही. खाबुगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक बिंदू नामावली तयार केली नाही. परिणामी खिसे जड करणाऱ्या शिक्षकांना नियमबाह्यरीत्या पदोन्नत्या व विविध भत्त्त्यांचा लाभ देण्यात आला. आयुक्त लहाने यांनी बिंदू नामावली तयार केल्यामुळे शिक्षण विभागातील भोंगळ कारभाराला लगाम लागला आहे.
उपायुक्तांकडे सोपवली जबाबदारी
शिक्षण विभागातील दुकानदारी लक्षात घेता बदली होणाऱ्या शिक्षकांची यादी तयार करण्याची जबाबदारी आयुक्त लहाने यांनी उपायुक्त समाधान सोळंके यांच्याकडे सोपवली आहे. सोळंके यांनी प्राथमिक यादी तयार केल्याची माहिती असून, येत्या तीन-चार दिवसांत अंतिम यादीवर शिक्कामोर्तब केले जाईल.