असंसर्गजन्य आजार जाताहेत नियंत्रणापलीकडे!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2019 03:11 PM2019-11-03T15:11:45+5:302019-11-03T15:11:51+5:30
राज्यात एनसीडी केंद्रांतर्गत २ लाख ५० हजार ८७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
- प्रवीण खेते
अकोला : बदलती जीवनशैली अन् वाढत्या तणावामुळे मधुमेह, कर्करोग, उच्च रक्तदाब यासारख्या असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या आजारांच्या यादीत कर्करोगापाठोपाठ रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून, नॅशनल हेल्थ प्रोफाइल-२०१९ च्या अहवालानुसार देशात ४० लाखांपेक्षा जास्त रुग्ण उच्च रक्तदाबाचे आढळले असून, राज्यात एनसीडी केंद्रांतर्गत २ लाख ५० हजार ८७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली.
चुकीच्या जीवनशैलीमुळे असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे; परंतु धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाचे आरोग्याकडे दुर्लक्ष विषाणूजन्य आजारांपेक्षा जास्त उच्च रक्तदाब, हृदयरोग, स्ट्रोक, मधुमेह आणि कर्करोगासारखे असंसर्गजन्य आजारांत लक्षणीय वाढ होत आहे. या असंसर्गजन्य आजारांनी देशभरात डोके वर काढले असून, कर्करोगापाठोपाठ मधुमेह अन् उच्च रक्तदाबाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. असंसर्गजन्य आजारांची वाढती संख्या ही धोक्याची पातळी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी नॅशनल हेल्थ प्रोफाइल-२०१९ प्रकाशित केले. त्यानुसार, देशभरात एनसीडी केंद्रांतर्गत देशभरातील ६.५१ कोटी रुग्णांची तपासणी करण्यात आली. यामध्ये देशभरात तब्बल ४० लाख उच्च रक्तदाबाचे रुग्ण आढळून आले. महाराष्ट्रात एनसीडी केंद्रांतर्गत तब्बल २ लाख ५० हजार ८७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे.
‘एनसीडी’ अंतर्गत राज्यात तपासणी
राज्यभरात जिल्हा स्तरावर शासकीय रुग्णालयांसह प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एनसीडी केंदे्र सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांतर्गत असंसर्गजन्य आजारांची तपासणी करण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या नॅशनल हेल्थ प्रोफाइल-२०१९ च्या अहवालानुसार, राज्यात ५८ लाख ८३ हजार ९१५ लोकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, कर्करोग आणि स्ट्रोकसह इतर असंसर्गजन्य आजारांच्या रुग्णांची तपासणी करण्यात आली.
असे आहे रुग्णांचे प्रमाण...
आजार - तपासणी केलेल्या रुग्णांची संख्या
मधुमेह - १,५५,६२८
उच्च रक्तदाब - २,५०,८७५
कर्करोग - १४,१०३
स्ट्रोक - ४,०१५
बदलत्या जीवनशैलीमुळे असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. या आजारांच्या निदानासाठी राज्यात जिल्हा व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर एनसीडी केंद्र कार्यरत आहेत. याच माध्यमातून अशा रुग्णांचे निदान करणे शक्य झाले आहे. केंद्र शासनाचा नॅशनल हेल्थ प्रोफाइल-२०१९ अहवालातून समोर आलेली बाब चिंताजनक आहे. त्यामुळे नागरिकांनी संतुलित जीवनशैलीचा अवलंब करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची गरज आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.