गैरहजर डॉक्टर, कर्मचार्यांना नोटीस बजावण्याचा आदेश!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:42 AM2018-02-13T01:42:47+5:302018-02-13T01:48:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी त्यांच्या आरोग्य जनता दरबार उपक्रमांतर्गत सोमवारी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाला भेट देऊन विविध वॉर्डची पाहणी केली. तसेच रुग्णांची विचारपूस करून त्यांच्या समस्या व अडचणी जाणून घेतल्या. यावेळी कर्तव्याला दांडी मारणार्या डॉक्टर, कर्मचार्यांच्या मुद्यावरून पालकमंत्र्यांनी रुग्णालय प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. विनापरवानगी कर्तव्यावर गैरहजर राहणार्या डॉक्टर, कर्मचार्यांना नोटीस बजावण्याचा आदेश पालकमंत्र्यांनी यावेळी दिला.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सोमवारी आयोजित जनता आरोग्य दरबारच्या निमित्याने पालकमंत्र्यांनी रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चौहान, प्रशासकीय अधिकारी संजय देशमुख हे उपस्थित होते. प्रारंभी रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६ व ७ मध्ये जाऊन त्यांनी रुग्णांची भेट घेतली. त्यांची सहानुभूतीने विचारपूस करून त्यांना मिळणार्या आरोग्यसेवेबाबत चौकशी केली. कर्तव्यावर असणारे डॉक्टर, पारिचारिका व इतर कर्मचारी यांचीही चौकशी करून रुग्णांना चांगल्या प्रकारच्या आरोग्य सुविधा देण्याबरोबरच वॉर्ड व स्वच्छतागृह स्वच्छ ठेवण्याचे निर्देश दिले. रुग्णालयातील स्वच्छता, डॉक्टर व कर्मचार्यांची उपस्थिती याबाबत त्यांनी माहिती जाणून घेत प्रत्यक्ष पाहणी केली. रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा पुरविण्याबरोबरच रुग्णालयातील सुविधांबाबत वैद्यकीय अधिकार्यांनी सजग राहावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
आरोग्य जनता दरबारात दोन तक्रारी
दरम्यान, आज झालेल्या जनता आरोग्य दरबारात दोन तक्रारी प्राप्त झाल्या. प्राप्त तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकार्यांना केली. यावेळी डॉ. कार्यकर्ते यांनी महाविद्यालय व रुग्णालयाबाबतच्या अडचणी मांडल्या.
रुग्णालयात परिचारिका व कर्मचार्यांची पदभरती, सुपरस्पेशालिटी रुग्णालयात नवीन पदांची निर्मिती याबाबतची माहिती त्यांनी पालकमंत्र्यांना दिली.
क्ष-किरण विभागाची झाडाझडती
सवरेपचार रुग्णालयातील क्ष-किरण विभागासंदर्भात रुग्णांच्या तक्रारी वाढत असल्याच्या पृष्ठभूमीवर पालकमंत्र्यांनी क्ष-किरण विभागाला भेट दिली. यावेळी या विभागात केवळ दोन कर्मचारी कर्तव्यावर असल्याचे दिसून आले.
पालकमंत्र्यांनी या विभागातील कर्मचार्यांची माहिती घेऊन, अनुपस्थित असलेल्या डॉक्टर व कर्मचार्यांना नोटीस बजावण्याचा आदेश अधिष्ठाता डॉ. राजेश कार्यकर्ते यांना दिला. त्यानुसार या कर्मचार्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
रुग्णालय परिसरातील अस्वच्छेतेवरूनही पालकमंत्र्यांनी ताशेरे ओढत स्वच्छता निरीक्षकास नोटीस बजावण्याचा आदेश दिला.