जीएमसीतील नॉनकोविड ओपीडी येतेय पूर्वपदावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:16 AM2021-01-04T04:16:17+5:302021-01-04T04:16:17+5:30
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवावगळता सर्व काही बंद होते, मात्र कोरोनाच्या भीतीने अनेक रुग्णांनी रुग्णालयात जाणे टाळल्याने या काळात रुग्णालयांमध्ये ...
लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवावगळता सर्व काही बंद होते, मात्र कोरोनाच्या भीतीने अनेक रुग्णांनी रुग्णालयात जाणे टाळल्याने या काळात रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या गर्दीमध्ये लक्षणीय कमी दिसून आली. जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव होण्यापूर्वी सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात दररोज साधारणत: दोन ते अडीच हजार रुग्ण तपासणीसाठी येत होते. लॉकडाऊन अन् कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता अनेकांनी घरगुती उपचारांना प्राधान्य दिले. त्यामुळे मध्यंतरी सर्वोपचार रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागातील गर्दी दहा टक्क्यांपेक्षा कमी झाली होती. सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस कोविडची रुग्णसंख्या कमी झाल्याने ओपीडीमध्ये नॉनकोविडच्या रुग्णांची गर्दी वाढू लागली आहे. सद्य:स्थितीत दररोज एक हजारापेक्षा जास्त रुग्ण रुग्ण उपचारासाठी जीएमसीतील नॉनकोविड ओपीडीमध्ये येत असल्याचे दिसून येत आहे.
नागरिक स्वत:च घेताहेत खबरदारी
नागरिक गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळत आहेत. रुग्णालयातही याचा प्रभाव दिसून येत आहे. प्रामुख्याने ज्या रुग्णांना जास्त त्रास आहे, असेच रुग्ण सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी येत आहेत. बहुतांश रुग्ण स्वत:च खबरदारी घेत असल्याने रुग्णालयात गर्दी करण्याचे टाळत असल्याचे दिसून येत आहे.
अशी आहे स्थिती
महिना - वर्ष (रुग्णसंख्या)
- २०२० - २०१९
जानेवारी - २,२०० - २,४५०
फेब्रुवारी - २,१०० - २,३००
मार्च - २,००० - २,५००
एप्रिल - १,००० - २३५०
मे - ८५७ - २,४६०
जून - ५४० - २, ५००
जुलै - ३५६ - २,५६०
ऑगस्ट - २५८ - २,४९०
सप्टेंबर - १५० - २,५००
ऑक्टोबर - ४५७ - २,४६०
नोव्हेंबर - ७८० - २,३७०
डिसेंबर - १०१४ - २,४२०