महाआघाडी नाहीच, प्रत्येक पक्ष कार्यकर्त्यांच्या बळावरच रिंगणात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:45 AM2021-01-13T04:45:05+5:302021-01-13T04:45:05+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क अकाेला : ग्रामपंचायत निवडणुकीतील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
अकाेला : ग्रामपंचायत निवडणुकीतील लढतीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. अनेक ठिकाणी महाविकास आघाडीतील घटक पक्षातील कट्टर कार्यकर्ते एकमेकांच्या विराेधात दंड थाेपटून उभे आहेत. परस्परविराेधी विचारसरणीचे शिवसेना, राष्ट्रवादी व काॅंग्रेस हे तीन पक्ष राज्यातील सत्तेसाठी एकत्र आले असले तरी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना संधी देण्याच्या नावाखाली एकत्र येऊ शकले नाहीत.
जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये २ हजार ७० जागांपैकी ३२० जागांवर उमेदवारांची अविरोध निवड निश्चित झाली असून, उमेदवारी अर्ज दाखल झाले नसल्याने, नऊ जागा रिक्त राहणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या १ हजार ७४१ जागांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
जिल्ह्यातील २४४ ग्रामपंचायतींच्या २,०७० जागांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. त्यामध्ये ग्रामपंचायतींच्या ३२० जागांसाठी प्रत्येकी एकाच उमेदवाराचा अर्ज राहिल्याने, संबंधित ३२० उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून अविरोध निवड निश्चित झाली आहे. तसेच जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एक याप्रमाणे नऊ जागांवर एकही उमेदवाराचा उमेदवारी अर्ज दाखल झाला नसल्याने, नऊ जागांवर ग्रामपंचायत सदस्यांची पदे रिक्त राहणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या १ हजार ७४१ जागांसाठी रिंगणात असलेले अनेक उमेदवार हे सत्तेतील घटक पक्षांचे असून, ते पक्षापेक्षा पॅनलच्या भरवशावर रिंगणात असल्याने निवडणुकीत महाविकास आघाडी कुठेही एकत्र नाही.
निकालानंतर महाआघाडी आठवेल
अनेक ग्रामपंचायतमध्ये पॅनल रिंगणात आहेत, या पॅनलमध्ये सर्वच पक्षांतील उमेदवारांचा समावेश आहे. पॅनलचा विजय झाल्यावर सरपंच पदावर ज्या सदस्याची वर्णी लागेल ताे सदस्य ज्या पक्षाचा आहे. त्या पक्षाची ती ग्रामंपचायत अशी आठवण महाविकास आघाडीतील घटक पक्षांना येऊ शकते.
विजय काेणत्या विचारसरणीचा झाला आहे यावरून पुढील याेजनाबाबत लाेकप्रतिनिधींची भूमिका राहू शकते.
ग्रामपंचायत निवडणूक अविराेध व्हावी हाच माझा प्रयत्न हाेता त्यासाठी मी आवाहनही केले हाेते त्यामुळे महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक एकत्रितपणे लढण्यावर भर दिलाच नाही स्थानिक नेतृत्वाला संधी मिळाली व पक्ष बळकट व्हावा सर्वच पक्षांचा प्रयत्न असताे.
- आमदार नितीन देशमुख,
जिल्हाप्रमुख, शिवसेना
ही निवडणूकही स्थानिक संबंधांवर असते, त्यामुळे कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची राहते गावपातळीवर नेतृत्व तयार व्हावे त्यांना राजकारणात संधी मिळावी या उद्देशाने स्थानिक पातळीवरच निवडणुकीबाबत पॅनल तयार झाले आहेत. आघाडी म्हणून आम्ही एक आहातेच.
संग्राम गावंडे
जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काॅंग्रेस
महाविकास आघाडी एकत्र लढावी असा प्रयत्न हाेता, मात्र गावातील राजकारण हे पक्षीय नसते ते स्थानिक पातळीवरील संबंधांवर अवलंबून असते. त्यामुळे सध्या घटक पक्षातील कार्यकर्ते उमेदवारी म्हणून एकमेकांसमाेर असले तरी त्यामधून पक्ष एकमेकांच्या विराेधात आहेत, असा अर्थ नाही.
- हिदायत पटेल,
जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
३३५ सदस्य अविराेध
जिल्ह्यात एका जागेसाठी एकाच उमेदवाराचा अर्ज राहिलेल्या ३३५ उमेदवारांची ग्रामपंचायत सदस्य म्हणून अविरोध निवड निश्चित झाली आहे. संबंधित सदस्यांची अविरोध निवड झालेल्या सदस्यांचा अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात येणार आहे. आयोगाची मान्यता प्राप्त झाल्यानंतर संबंधित सदस्यांची अविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात येणार आहे.