केवळ कौतुकाच्या थापीने पोट भरत नाही, कामाला सन्मान मिळाला पाहीजे - संध्या पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 08:54 PM2020-10-10T20:54:48+5:302020-10-10T20:54:58+5:30
आशा स्वयंसेविकांना सेवेत कायम करण्याची गरज आहे, असे मत आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटनेच्या जिल्हा सचिव संध्या पाटील यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.
अकोला : आशा स्वयंसेविकांना करावी लागणारी कामे, कामाचा मिळणारा मोबदला लक्षात घेता, केवळ कौतुकाच्या थापीने पोट भरणार नाही तर त्यांच्या कामाला योग्य सन्मान मिळाला पाहीजे. त्यासाठी शासनाने आशा स्वयंसेविकांना सेवेत कायम करण्याची गरज आहे, असे मत आशा वर्कर व गटप्रवर्तक संघटनेच्या जिल्हा सचिव संध्या पाटील यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. काम करताना येणाऱ्या विविध समस्यांचा सामना करण्यासाठी आशा स्वयंसेवकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगीतले.
आशा स्वयंसेविकांचे काम व मोबदल्याचे स्वरुप कसे आहे?
आशा स्वयंसेवकांना सद्यस्थितीत कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये आरोग्य सर्वेक्षणासह आरोग्य विभागांतर्गत विविध सर्वेक्षणाची कामे करावी लागतात. मात्र कामावर आधारित मोबदला मिळत नाही. दरमहा केवळ तीन ते साडेतीन हजार रुपये मोबदला मिळतो. काम जास्त आणि मोबदला अत्यल्प मिळत असल्याने उदरनिर्वाह कसा चालविणार, असा प्रश्न सतावतो.
सुरक्षेच्यादृष्टीने उपाययोजनांची गरज आहे का?
आशा स्वयंसेविकांना गावातील प्रत्येक घरात जाऊन आरोग्य सर्वेक्षणात माहती संकलीत करण्याचे काम करावे लागते. त्यामध्ये अनेकदा वाद आणि मारहाणीच्या प्रसंगाचा सामना करावा लागतो. त्यामुळे आशा स्वयंसेविकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने शासनाने उपाययोजना करण्याची नितांत गरज आहे.
कोरोना काळात काम करताना कोणत्या समस्यांचा सामना करावा लागतो?
घरोघरी आरोग्य सर्वेक्षणाच्या कामात आशा स्वयंसेविकांना घरातील सर्व सदस्यांची नावे नोंदवून आॅक्सीजन पातळी, तापमान, कोवीडची लक्षणे आदी प्रकारची माहिती वर्गीकरण करुन माहिती मोबाईल अॅपमध्ये संकलीत करण्याचे सांगण्यात आले.परंतू अनेक आशा स्वयंसेविकांकडे स्मार्टफोन नसल्याने, ही माहिती आॅनलाईन संकलीत कशी करणार, याबाबतच्या समस्येचा सामना त्यांना करावा लागत आहे.दिवसभर केलेल्या कामाचा मोबदला केवळ १५० रुपये मिळत असून‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ या मोहिमेत गठित करण्यात आलेल्या आरोग्य पथकातील इतर सदस्यांनी सर्वेक्षण करण्यास नकार दिल्याने, आरोग्य सर्वेक्षणाच्या कामाचा भार आशा स्वयंसेविकांना सहन करावा लागत आहे. मास्क, सॅनिटाझर, टोपी, टी-शर्ट इत्यादी साहित्य अद्यापही मिळाले नाही.
कामाच्या मोबदल्यासंदर्भात काय मागणी आहे?
आशा स्वयंसेविकांना कराव्या लागणाºया कामांचा विचार करुन, त्याआधारे इतर राज्यांप्रमाणे राज्यातील आशा स्वयंसेविकांना कामाचा मोबदला म्हणून शासनाने दरमहा किमान दहा हजार रुपये मानधन दिले पाहीजे.