तीन महिन्यांचे एकदाच नव्हे, दरमहा मिळेल धान्य!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 08:36 AM2020-04-02T08:36:01+5:302020-04-02T08:36:08+5:30

धान्य वाटप प्रक्रियेत कुठल्याही टप्प्यावर हलगर्जी झाल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.

Not just once in three months, you get grain every month! | तीन महिन्यांचे एकदाच नव्हे, दरमहा मिळेल धान्य!

तीन महिन्यांचे एकदाच नव्हे, दरमहा मिळेल धान्य!

Next

- सदानंद सिरसाट
अकोला : कोरोना व्हायरसच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांमध्ये गोरगरीब, मजुरांची उपासमार होऊ नये, यासाठी देशभरातील शिधापत्रिकाधारकांना तीन महिन्यांचे धान्य मोफत दिले जाणार आहे. तीन महिन्याचे धान्य एकाच वेळी नव्हे, तर दरमहा लाभार्थींना वाटप करण्याचा आदेश ३१ मार्च रोजी अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिला. या प्रकाराने राज्यभरातील दुकानदारांसह पुरवठा यंत्रणेचाही जीव भांड्यात पडला, तर धान्य वाटप प्रक्रियेत कुठल्याही टप्प्यावर हलगर्जी झाल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.
केंद्र व राज्य शासनाने देशातील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. त्यामुळे देशभरातील गरीब, मजुरांवर उपासमारीची वेळ येत आहे. त्यावर उपाय म्हणून सार्वजनिक वितरण व्यवस्थेतून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत दिल्या जाणाऱ्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति सदस्य प्रती माह ५ किलो धान्य तीन महिने मोफत दिले जाणार आहे. धान्य वाटपाचे हे परिमाण पाहता दुकानदार आणि यंत्रणेचा कमालीचा गोंधळ व धावपळ होण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यावर शासनाने ३१ मार्च रोजी दिलेल्या आदेशानुसार अनेकांचा जीव भांड्यात पडला आहे.
माहे एप्रिल, मे, जून या तीन महिन्यांसाठी दिलेल्या अन्नधान्याच्या नियमित नियतनानुसार धान्याचे वाटप त्या-त्या महिन्यात केले जाणार आहे. या निर्देशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.


- अंत्योदय लाभार्थींना अतिरिक्त वाटप
सर्व प्रकारातील लाभार्थींना दरमहा नियमित धान्य वाटप केल्यानंतर अंत्योदय लाभार्थींना प्रति सदस्य पाच किलोप्रमाणे अतिरिक्त तांदळाचे वाटप केले जाणार आहे. सोबतच प्राधान्य कुटुंबातील लाभार्थींनाही त्याच प्रमाणात वाटप करण्याचेही आदेशात म्हटले.


- अतिरिक्त तांदूळ वाटपात कुचराई भोवणार!
नियमित धान्यासोबतच अतिरिक्त तांदूळ वाटप करण्यास जिल्हा पुरवठा अधिकारी, अन्नधान्य वितरण अधिकारी, उपनियंत्रक यांच्या स्तरावर कुचराई झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.


- राज्यासाठी ५.४० लाख क्विंटल अतिरिक्त तांदूळ
राज्यातील अंत्योदय योजनेच्या २५ लाख शिधापत्रिकाधारक कुटुंबातील सदस्यांसाठी ५ लाख ४० हजार २० क्विंटल अतिरिक्त तांदूळ मंजूर करण्यात आला आहे. ठरलेल्या परिमाणानुसार त्याचे वाटप होणार आहे.

 

Web Title: Not just once in three months, you get grain every month!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Akolaअकोला