मोदी नव्हे, तर संघच चालवितो देश- खरगे यांचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2019 02:01 PM2019-04-08T14:01:57+5:302019-04-08T14:02:05+5:30
अकोला: केंद्र सरकारचे नेतृत्व जरी मोदींच्या हाती असले, तरी प्रत्यक्षात राष्टÑीय स्वयंसेवक संघच हा देश चालवित असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला.
अकोला: केंद्र सरकारचे नेतृत्व जरी मोदींच्या हाती असले, तरी प्रत्यक्षात राष्टÑीय स्वयंसेवक संघच हा देश चालवित असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. अकोट येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, की संघाने आपला अजेंडा राबविण्यासाठी भाजपाच्या सत्तेचा पूर्णपणे वापर केला आहे. ही मंडळी संविधानविरोधी आहेत, त्यामुळे भाजपाला होणारे मतदान हे संविधान विरोधातील मतदान ठरणार असल्याचेही ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीनिमित्त महाराष्ट्रात मल्लिकार्जुन खरगे यांची पहिली प्रचारसभा अकोला जिल्ह्यातील अकोट येथे ७ एप्रिल रोजी पार पडली. यावेळी त्यांनी भाजपाचा समाचार घेतला. भाजपा ही सत्तेसाठी निर्माण झालेली पार्टी आहे. शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर त्यांच्या घरी जाण्यासाठी मोदींना वेळ नाही. मोदी संसदेत बोलत नाहीत, फक्त विदेशात बोलतात. गेल्या पाच वर्षांत ते संसदेमध्ये के वळ २५ तास २५ मिनिटे बोलले आहेत. हा देश ते चालवितच नाहीत तर संघ चालवितो, असा घणाघात त्यांनी केला. मोदी संसदेमध्ये म्हणतात, काँग्रेसने देशाला बरबाद केले; परंतु काँग्रेसने देशाला बरबाद केले असते तर मोदी संसदेमध्ये पंतप्रधान म्हणून खुर्चीवर बसू शकले नसते. मोदी खुर्चीवर बसले ते संविधान आणि लोकशाहीमुळे हे मोदी विसरत असून, संविधान बदलविण्याची भाषा करीत असल्याचा आरोपही खरगे यांनी केला. संविधानाच्या रक्षणाकरिता काँग्रेस निवडणूक रिंगणात आहे. तेव्हा ही निवडणूक एका समाजाची किंवा एका व्यक्तीची निवडणूक नाही, तर विचारधारेची निवडणूक आहे, असेही त्यांनी नमूद केले. याप्रसंगी अकोला लोकसभेचे काँग्रेसचे उमेदवार हिदायत पटेल, काँग्रेसचे, राष्ट्रीय सचिव आशिष दुवा, माजी मंत्री वसंतराव पुरके, माजी राज्यमंत्री सुधाकरराव गणगणे, अनंतराव देशमुख, रामदास बोडखे, प्रा. मुकुंद खैरे यांच्यासह आघाडीचे सर्व जिल्ह्याचे नेते तसेच माजी आमदार उपस्थित होते. संचालन प्राध्यापक संजय घोडके यांनी केले.