उघडलाच नाही सट्टाबाजार..!
By admin | Published: February 22, 2017 02:41 AM2017-02-22T02:41:53+5:302017-02-22T02:41:53+5:30
अकोला महापालिका निवडणुकीत एकाही बुकीने सट्टय़ाचा उतारा घेतला नाही.
अकोला, दि. २१-जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी क्रिकेट सटोडियांवर केलेल्या धाडसी कारवाईचा प्रभाव अकोल्यातील बुकींवर अजूनही कायम असल्याने यंदा महापालिका निवडणुकीत सट्टाबाजार उघडलाच नाही.
पाऊस पाण्यापासून, क्रिकेट मॅच, देश-विदेशातील महत्त्वपूर्ण घडामोडी आणि निवडणुकांवर अकोल्यात कोट्यवधीचा सट्टा कधी काळी खेळला जायचा. अकोल्यातील क्रिकेट सट्टय़ाचे जाळे तर देशभरात विखुरले आहे. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांवर तर अकोल्यातील सटोडियांचे विशेष लक्ष लागून राहायचे. यंदाची महापालिका निवडणूक शेवटच्या चरणात पोहोचल्यानंतर सुद्धा सट्टाबाजार उघडला नाही. महापालिका निवडणुकांवर सट्टा लावणारे नेहमीच्या लोकांनी मामा, बंटी, शरद, राजू या अकोल्यातील नामी बुकींना फोन केला असता, त्यांनी सट्टा बाजारात खायवाळी नसल्याचे सांगितले. मध्यंतरी पोलीस अधीक्षकांनी अकोल्यातील नामी सटोडियांवर कारवाई केली. या कारवायासोबतच प्रत्येकाला कक्षात बोलावून पाहुणचार दिला.
पोलीस अधीक्षकांच्या दणक्यामुळे अकोला महापालिका निवडणुकीत एकाही बुकीने सट्टय़ाचा उतारा घेतला नाही. दरम्यान, डॉन नामक एक बुकी प्रत्यक्षात महापालिका निवडणुकीत असल्याने आणि दुसर्या एका उमेदवाराचा नातेवाईक शरद मोठा बुकी असतानादेखील अकोल्यातील सट्टाबाजार यंदा उघडला नाही. नेहमीचा उतारा घेणार्या सटोडियांना याबाबत विचारणा केली असता, एकही बुकी निवडणुकीचा उतारा घेण्यास तयार नव्हता.
जिल्हा पोलीस अधीक्षक मीणा यांच्या कारवाईचा प्रभाव अजूनही सटोडिये आणि बुकी विसरलेले नाहीत.
मंगळवारी अनेकांचे मोबाइल रिचेबल नव्हते. त्यामुळे नेमका अंदाज काढणे अनेकांसाठी कठीण झाले. काही जणांनी आपसातच विविध ग्रुप तयार करून पैज लावली आहे. सटटा बाजाराचा अंदाज नसल्यामुळे भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारिप-बमसंचे या पक्षांचे नेते त्यांच्याच चष्म्यातून एक्झिट पोल काढून पाहत आहेत.