..अन् स्मशानभूमित केले मुलाचे नेत्रदान
By admin | Published: December 8, 2014 11:44 PM2014-12-08T23:44:20+5:302014-12-09T00:05:31+5:30
नेत्रदानाबाबत जागरूकता : मुलाच्या डोळयातून दुस-याने जग पहावे, या उदात्त हेतूने केले नेत्रदान.
नंदकिशोर नारे/ वाशिम
कुटुंबावर एकीकडे दु:खाचा डोंगर कोसळला असताना, मुलाच्या डोळयातून दुसर्याने जग पहावे, या उदात्त हेतूने वाशिम जिल्ह्यातील एका कुटुंबाने मुलाचे अंत्यसंस्कार थांबवून स्मशानभूमितच नेत्रदान केले. इच्छाशक्ती प्रबळ असल्यास अशक्य काहीच नाही, याची प्रचिती या कुटुंबाने दिली. वाशिम जिल्हयातील मालेगाव येथील रहिवासी विजय सिताराम लटुरिया हे कोलकाता येथे जात असताना अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वरजवळ २ डिसेंबर रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला. मालेगाव येथील स्मशानभूमित त्यांचे पार्थीव अंत्यसंस्कारासाठी नेले जात असताना, सितारामजी लटुरिया आणि त्यांच्या कुटुंबियांनी बालरोग तज्ञ डॉ. हरिष बाहेती यांच्याकडे नेत्रदानाची इच्छा व्यक्त केली. डॉ. बाहेती यांनी तत्काळ नेत्रचिकीत्सा अधिकारी जे.एस. बाहेकर यांच्याशी संपर्क साधला. नेत्रदान स्मशानभूमित करणे शक्य आहे का, असा प्रश्न त्यांनी विचारला. बाहेकर यांनी होकार दिला. त्यानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयाचे पथक क्षणाचाही विलंब न करता स्मशानभूमित पोहोचले. त्यांनी विजयचे नेत्रबुबुळ काढून जालना येथील गणपती नेत्रालयात पाठविले. यावेळी उपस्थितांनी लटुरिया परिवाराने नेत्रदानाविषयी दाखविलेल्या जागरूकतेबाबत गौरवदार काढले. स्मशानभूमित जाऊन नेत्रदान करण्याचा हा जिल्हयातीलच नव्हे तर राज्यात पहिल्यांदाच झालेला प्रकार असावा. नेत्रदानाबाबत जागरूकता दाखविल्याबद्दल अंधत्व नियंत्रण कार्यक्रम अधिकारी समितीचे अध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी रूचेश जयवंशी व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मेंढे यांनी लटुरिया कुटुंबियांचे आभार व्यक्त केले.