अकोला परिमंडळाचे 'नथिंग टू से' ठरले सर्वोत्तम नाटक
By Atul.jaiswal | Published: April 7, 2024 05:52 PM2024-04-07T17:52:49+5:302024-04-07T17:53:05+5:30
महावितरण नाट्य स्पर्धा : चंद्रपूरच्या ‘द फियर फॅक्टर'ला द्वितीय क्रमांक
अकोला : महावितरण नागपूर परिक्षेत्राअंतर्गत अमरावती येथील संत ज्ञानेश्वर सांस्कृतीक सभागृह येथे ५ व ६ एप्रिल रोजी पार पडलेल्या दोन दिवसीय नाट्य स्पर्धेत अकोला परिमंडळाच्या नाटयकलावंतानी सादर केलेल्या ‘ नथिंग टू से ’ या नाटकाने सर्वोत्तम नाटकाच्या पुरस्कारासह विविध वर्गवारीतील सहा प्रथम आणि एक व्दितीय पुरस्कार पटकावून बाजी मारली. तर चंद्रपूर परिमंडळाचे ‘ द फियर फॅक्टर ’ हे नाटक उपविजेते ठरले.
मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर द्वारा निर्मित, प्रसाद दाणी यांनी लिहलेले आणि संजय पुरकर यांनी दिग्दर्शित केलेल्या 'नथिंग टू से' या नाटकांने नाट्यरसिकांच्या भावना अनावर केल्या. या नाटकाला दिग्दर्शन, पार्श्वसंगीत, प्रकाश योजना, रंगभूषा –वेशभूषा या श्रेणीत प्रथम, तर नेपथ्यामध्ये द्वितीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले.
नागपुर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक सुहास रंगारी यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कारांचे वितरण करून सन्मानित करण्यात आले. महावितरण नागपुर परिक्षेत्राअंतर्गत पार पडलेल्या या स्पर्धेकरीता अकोला,अमरावती, नागपुर, चंद्रपूर आणि गोंदिया परिमंडळातील सर्व वरीष्ठ अधिकारी व नाटयरसिकांची मांदियाळी उपस्थित होती. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रफुल्ल देशमुख आणि प्रियंका सोळंके यांनी केले तर आभारप्रदर्शनउपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मधुसूदन मराठे यांनी केले.
नाटकाला मिळालेले पुरस्कार
सर्वोत्कृष्ट अभिनेता : ग्यानेश पानपाटील
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : गौरी पूरकर
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन : संजय पुरकर
पार्श्वसंगीत : शुभम बारड
प्रकाश योजना : किशोर दाभेकर
रंगभूषा –वेशभूषा : प्रमोद अंभोरे,निलेश मगर
नेपथ्य : गोपाल पेचफुले (द्वितीय)
उत्तेजनार्थ : विजय गावात्रे