रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रकचालकांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 12:26 PM2019-01-22T12:26:01+5:302019-01-22T12:26:08+5:30
अकोला: बऱ्हाणपूरच्या रॉयल्टीवर बुलडाणा व अकोला जिल्ह्यात रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणाºया ट्रकला परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश देशमुख व जुने शहर पोलिसांनी पकडले होते.
अकोला: बऱ्हाणपूरच्या रॉयल्टीवर बुलडाणा व अकोला जिल्ह्यात रेतीची अवैधरीत्या वाहतूक करणाºया ट्रकला परिविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश देशमुख व जुने शहर पोलिसांनी पकडले होते. सदर ट्रकमध्ये रेतीची अवैधरीत्या तसेच ओव्हरलोड वाहतूक होत असल्याचे समोर आल्यानंतर उपप्रादेशिक परिवहन विभागाने व शहर वाहतूक शाखेने या वाहनांची तपासणी केली असून, या ट्रकचा चालक व मालकांना नोटीस बजावून हजर राहण्याचा आदेश दिला आहे.
मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर येथील रेती वाहतुकीच्या रॉयल्टीच्या आधारावर शेगाव येथील रहिवासी सुरेंद्र देवराव सावळे यांच्या मालकीच्या एम एच २८ बीबी ०१४५ क्रमांकाच्या ट्रकमध्ये रेतीची अवैधरीत्या वाहतूक सुरू असल्याची माहिती जुने शहर पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारावर उपविभागीय पोलीस अधिकारी देशमुख आणि जुने शहरचे तत्कालीन ठाणेदार अन्वर शेख यांनी संयुक्तरीत्या कारवाई करीत रेतीची ओव्हरलोड वाहतूक करीत असलेल्या या ट्रकला पकडले होते. त्यानंतर सदर ट्रक उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे तपासणीसाठी पाठविला असता या ट्रकमधून रेतीची वाहतूक ओव्हरलोड असल्याचे समोर आले. त्यानंतर हा ट्रक वाहतूक शाखेच्या ताब्यात देण्यात आला असून, वाहतूक शाखेने या ट्रकच्या चालकास मालकास २१ जानेवारी रोजी हजर राहण्यासाठी नोटीस दिली होती.
महसूल विभागाची हप्तेखोरी
मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर तसेच बुलडाणा जिल्ह्यातील रॉयल्टीच्या आधारे जिल्ह्यात रेती माफियांनी धुडगूस घातला आहे. बाळापूर तालुक्यातून रेतीची अवैधरीत्या सर्रास वाहतूक सुरू असताना येथील महसूल प्रशासन मात्र डोळेझाक करीत असल्याने माफियांकडून मोठी हप्तेखोरी सुरू असल्याचे वास्तव आहे. पोलिसांनी वारंवार कारवाया केल्यानंतर महसूल विभागाने मात्र रेती माफियांना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.