अकोल्यातील बँकांना प्राप्तिकर अधिकार्यांची नोटीस; आहुजा-मोटवाणी फर्मची तपासणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 12:27 AM2018-02-05T00:27:06+5:302018-02-05T00:28:52+5:30
२00 अधिकार्यांच्या पथकातील काही अधिकारी परतले असले, तरी अजूनही या मोहिमेतील प्रमुख अधिकारी अकोल्यात तळ ठोकून आहेत. प्राप्तिकर अधिकार्यांनी जवळपास ३५ बँकांना नोटीस बजाविली असून आहुजा-मोटवाणीशी संबंधित कोणतेही बँक खाते असल्यास त्याची माहिती देण्याचे नोटीसद्वारे कळविले आहे. आता बँकेचे अधिकारी याला किती प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याच्या आरोपाखाली नागपूरच्या प्राप्तिकर अधिकार्यांनी ३१ जानेवारी रोजी येथील आहुजा-मोटवाणी यांच्या २१ फर्मवर छापा टाकून केलेली कारवाई पाचव्या दिवशीही सुरु होती. २00 अधिकार्यांच्या पथकातील काही अधिकारी परतले असले, तरी अजूनही या मोहिमेतील प्रमुख अधिकारी अकोल्यात तळ ठोकून आहेत. प्राप्तिकर अधिकार्यांनी जवळपास ३५ बँकांना नोटीस बजाविली असून आहुजा-मोटवाणीशी संबंधित कोणतेही बँक खाते असल्यास त्याची माहिती देण्याचे नोटीसद्वारे कळविले आहे. आता बँकेचे अधिकारी याला किती प्रतिसाद देतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कोलकाता येथील शेअर बाजारातील संशयास्पद उलाढालीमुळे अकोल्यातील बेहिशेबी मालमत्ता प्रकरण उजेडात आले. प्राप्तिकर खात्याचे नागपूर विभागाचे डीआय (डायरेक्टर ऑफ इन्व्हेस्टिगेशन) जयराज काजला यांच्या निर्देशान्वये सहायक डीआय एस.पी.जी. मुदलियार यांच्या नेतृत्वात ३१ जानेवारी रोजी अकोल्यात सकाळी सहा वाजतापासून आहुजा-मोटवाणी ग्रुपच्या २१ फर्मवर सर्च मोहीम सुरू झाली आहे. कोठडी बाजारातील दयाराम अँन्ड सन्स, कॉटन मार्केटमधील धनराज ट्रेडर्स, वाशिम बायपासजवळील न्यू किराणा बाजारातील दयाराम अँन्ड सन्स, धनराज अँन्ड सन्स, एमआयडीसी चारच्या ग्रोथ सेंटरमधील दयाराम इंडस्ट्रिजमध्ये आणि मोटवाणी यांच्या दगडी पुलाजवळील सिंध हार्डवेअर, टिळक मार्गाच्या अलंकार मार्केटमधील रेणुका बिल्डिंगमधील मे. हकीकतराय अँन्ड सन्स, एमआयडीसीतील बीके चौकातील योगेश स्टिल आणि मोटवाणी यांचे पार्टनर तरुण कॉक री अँन्ड मेटल, या सदस्यांच्या पक्की-कच्ची खोलीतील निवासस्थानी ही झाडाझडती घेतली गेली. शनिवारपर्यंत अधिकार्यांनी २१ फर्मचे दस्तऐवज जप्त केलेत. आता या संपत्तीची माहिती जुळविण्याचे हिशेब सुरू आहे. अकोल्यातील तीन बॅंकांमधील लॉकर्सची झाडाझडती घेतली गेली असून, काही बँकांत नातेवाईकांच्या नावे रकमा आणि व्यवहार केल्याचा संशय प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्यांना आहे.