अकोला जिल्ह्यात ३०० पेक्षा जास्त बियाणे विक्रेत्यांना नोटीस!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2020 10:23 AM2020-08-23T10:23:24+5:302020-08-23T10:23:47+5:30
बियाणे विक्री परवान्यासोबतच रासायनिक खत विक्रेतेदेखील कृषी विभागाच्या रडारवर असल्याची माहिती आहे.
अकोला: यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या. या तक्रारीनंतर जिल्हा कृषी विभागाने कारवाईला सुरुवात करत जिल्ह्यातील ३०० पेक्षा जास्त बियाणे विक्रेत्यांना नोटीस बजावली आहे.
यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाचे आगमन झाल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीनची पेरणी केली; मात्र पेरलेले सोयाबीनचे बियाणे उगवलेच नसल्याच्या तक्रारी जिल्ह्यातील विविध भागातून येऊ लागल्या. या तक्रारींचे गांभीर्य घेत कृषी विभागातर्फे कारवाईला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला बियाणे कंपन्यांविरुद्ध न्यायालयात याचिका दाखल केल्या, तर आता बियाणे विक्रेत्यांना नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात जवळपास ३०० पेक्षा जास्त कृषी केंद्र संचालकांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यामध्ये दोषी आढळणाºया कृषी केंद्र संचालकांचे परवाने रद्द करण्याची कारवाई होऊ शकते, असेही कृषी विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले. यापूर्वी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कृषी केंद्र संचालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या विरोधात कृषी व्यावसायिक संघातर्फे राज्यव्यापी आंदोलन केले होते.
खतांचे परवाने रद्द करण्याची तयारी
बियाणे विक्री परवान्यासोबतच रासायनिक खत विक्रेतेदेखील कृषी विभागाच्या रडारवर असल्याची माहिती आहे. जवळपास २२ रासायनिक खत विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याच्या तयारीत कृषी विभाग आहे.
बियाणे न उगवल्याप्रकरणी बियाणे कंपन्यांसोबतच बियाणे विक्रेत्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. बियाणे विक्रेते दोषी आढळल्यास त्यांच्यावर नियमानुसार कारवाई होईल.
- मोहन वाघ, जिल्हा कृषी अधीक्षक,अकोला.
शेतकºयांचे नुकसान होऊ नये, असे आम्हाला वाटते. कृषी विभागाने दिलेल्या नोटीसनुसार, त्यांना आवश्यक दस्तऐवजांची पूर्तता केली जाईल. जिल्ह्यात प्रमाणीत बियाण्यांचीच विक्री करण्यात आली आहे; मात्र ज्यांनी अप्रमाणीत बियाणे विक्री केली, अशांच्या पाठीमागे संघटना नाही.
- मोहन सोनोने, कार्यकारी अध्यक्ष, जिल्हा व्यावसायिक संघ, अकोला.