मालमत्तांच्या नोटीस; अर्ज भरून देण्यासाठी सेवा केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 04:14 PM2020-03-06T16:14:32+5:302020-03-06T16:14:52+5:30
या उपक्रमामुळे नागरिकांना काही अंशी का होईना, दिलासा मिळणार आहे.
अकोला : महापालिका प्रशासनाने अकोलेक रांना मालमत्तांच्या सुधारित नोटीस जारी केल्या. त्यासोबत जोडलेला अर्ज भरताना नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेता प्रभाग क्रमांक १२ मधील राजपुतपुरा येथील श्री विघ्नहर्ता परिवार, भाजपमध्ये मंडळाच्या वतीने उद्या ६ मार्चपासून अर्ज भरून देण्यासाठी नागरिक सेवा केंद्र सुरू केले जाणार आहे. या उपक्रमामुळे नागरिकांना काही अंशी का होईना, दिलासा मिळणार आहे.
महापालिकेने १८ वर्षांनंतर प्रथमच २०१६ मध्ये संपूर्ण शहरातील मालमत्तांचे ‘जीआयएस’ प्रणालीद्वारे सर्वेक्षण करून मालमत्ता दरात वाढ केली. ही वाढ अवाजवी असल्याचा आरोप करीत काँग्रेस, शिवसेना, भारिप-बमसंच्यावतीने विविध आंदोलने छेडण्यात आली होती. करवाढीच्या मुद्यावर काँग्रेसचे नगरसेवक डॉ. जिशान हुसेन यांनी नागपूर हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. त्यावर सुनावणी पार पडली असता, द्विसदस्यीय खंडपीठाने मनपाची सुधारित दरवाढ रद्द करण्याचे निर्देश देत २००२ ते २०१७ या कालावधीत लागू असलेले जुने दर कायम ठेवण्याचे नमूद केले. तसेच मालमत्तांचा भाडेमूल्यावर आधारित सुधारित सर्व्हे करण्याचे निर्देश दिले. त्यानुषंगाने मनपाने अकोलेकरांना पुन्हा नोटीस जारी केल्या. त्यासोबत अर्ज पाठविण्यात आला. अर्जातील क्लिष्ट वाक्य पाहता सर्वसामान्य अकोलेकरांचा गोंधळ उडाल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांचे अर्ज भरून देण्यासाठी प्रभाग १२ मधील श्री विघ्नहर्ता परिवार व भाजप मध्य मंडळाच्यावतीने सेवा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही सेवा पूर्णत: नि:शुल्क दिली जाणार आहे.
उद्यापासून सेवा केंद्र कार्यान्वित
प्रभाग क्रमांक १२ मधील राजपुतपुरा, खोलेश्वर, अनिकट, राधाकिसन प्लॉट, आळशी प्लॉट, पत्रकार कॉलनी आदी भागातील रहिवाशांसाठी उद्या ६ मार्चपासून दररोज सायंकाळी ६.३० ते ८ पर्यंत संजय गोटफोडे, संभव अपार्टमेंटसमोर, राजपुतपुरा येथे नागरिकांच्या समस्यांचे समाधान करून त्यांचे अर्ज नि:शुल्क भरून दिल्या जाणार आहेत.