निवडणूकविषयक खर्च सादर न केल्यामुळे सहा उमेदवारांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 02:05 PM2019-10-14T14:05:48+5:302019-10-14T14:05:58+5:30
१७ उमेदवारांपैकी सहा उमेदवारांनी अद्याप निवडणूक खर्चविषयक लेखे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमक्ष सादर केले नसल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोट : अकोट विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या १७ पैकी सहा उमेदवारांनी निवडणुकविषयक खर्च सादर केला नसल्याचे समोर आले आहे. या सहाही उमेदवारांना निवडणूक विभागाने नोटीस बजावली आहे.
निवडणूक निरीक्षक (खर्च) यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ च्या अनुषंगाने अकोट विधानसभा मतदारसंघातील उमेदवारांनी सादर केलेल्या खर्चविषयक लेख्यांची तपासणी केली. यामध्ये एकूण १७ उमेदवारांपैकी सहा उमेदवारांनी अद्याप निवडणूक खर्चविषयक लेखे निवडणूक निर्णय अधिकारी यांच्यासमक्ष सादर केले नसल्याचे समोर आले आहे. यामध्ये अशोक किसनराव थोरात (अपक्ष), जितेंद्र बसवंत साबळे (अपक्ष), प्रमोद रामचंद्र खंडारे (अपक्ष), संतोष सूर्यभान देऊलकर (पीपल्स पार्टी आॅफ इंडिया), तुषार नाजूकराव पुंडकर (प्रहार जनशक्ती पार्टी), गजानन शांताराम तायडे (महाराष्ट्र परिवर्तन सेना) यांचा समावेश आहे. या सर्व उमेदवारांना नोटीस बजावण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाने दिली आहे.
विनापरवाना भाजपचा झेंडा लावणे भोवले! आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
मूर्तिजापूर : परवानगी न घेता भाजपचा झेंडा वाहनावर लावल्याप्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी भरारी पथकाच्या फि र्यादीवरून मालवाहू वाहन चालकाविरुद्ध १३ आॅक्टोबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात भरारी पथक गस्तीवर असताना मालवाहू वाहन क्र. एमएच ०१ एलए २११५ वर भाजपचा झेंडा लावलेला आढळला. यावेळी पथकातील रामराव जाधव, संदीप बोळे, संंतोष सोनोने व इतरांनी हे वाहन अडविले. वाहन चालकाला झेंडा लावण्याविषयी परवानगी मागितली असता त्याच्याकडे कुठलीही परवानगी आढळली नाही. त्यामुळे पथकाने वाहन जप्त करून मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनला लावले. याप्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी भरारी पथकाच्या फिर्यादीवरून वाहन चालक शे. वसीम शे. नजीम रा. अमरावती याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.