खैर माेहम्मद प्लाॅटमधील कुख्यात गुंड एक वर्षासाठी स्थानबद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:21 AM2021-07-14T04:21:56+5:302021-07-14T04:21:56+5:30
अकोला : डाबकी राेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खैर माेहम्मद प्लाॅट येथील रहिवासी तसेच कुख्यात गुंड शख ऐतल शेख जब्बार ...
अकोला : डाबकी राेड पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील खैर माेहम्मद प्लाॅट येथील रहिवासी तसेच कुख्यात गुंड शख ऐतल शेख जब्बार यास जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानंतर साेमवारी जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी एमपीडीए व हद्दपारीचे अस्त्र उगारले आहे़
खैर माेहम्मद प्लाॅट येथील रहिवासी तसेच कुख्यात गुंड शख ऐतल शेख जब्बार (वय २५) हा कुख्यात गुंड असून पोलिसांच्या कारवाईला जुमानत नसल्याचे समोर आले. त्याच्याविरुद्ध यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल असून यामध्ये दुखापत करणे, शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीररीत्या शस्त्र बाळगणे, विनयभंग करणे या गुन्ह्यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली; मात्र या कारवाईला जुमानत नसल्याने त्याच्याविरुद्ध एमपीडीए अंतर्गत मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यासाठीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर करण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला मंजुरी देऊन या आरोपीला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश पारित केला. त्यानंतर पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पाेलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने आरोपीचा शोध घेऊन त्यास जिल्हा मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शैलेश सपकाळ, डाबकी राेडचे ठाणेदार विजय नाफडे, साहायक पाेलीस निरीक्षक लांडगे, मंगेश महल्ले यांनी केली.
एका वर्षात ३० गुंडांचा बंदाेबस्त
जुलै २०२० ते २०२१ या एका वर्षाच्या कालावधीत अकाेला जिल्ह्यातील तब्बल ३० गुंडांवर एमपीडीए कारवाई करण्यात आली आहे़ राज्यात हा आकडा सर्वाधिक असून यापूर्वी एवढ्या माेठ्या प्रमाणात अशा कारवाया झाल्या नसल्याचे वास्तव आहे़ ३० गुंडांवर एमपीडीए कारवाई करून त्यांना मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे़