अकोल्यात नोव्हेंबर महिनाही ठरला वायू प्रदूषणाचा, संपूर्ण ३० दिवस प्रदूषित
By Atul.jaiswal | Published: December 2, 2023 03:00 PM2023-12-02T15:00:49+5:302023-12-02T15:01:06+5:30
हवेत सूक्ष्म धूलिकणाचे प्रमाण वाढले
अकोला : विदर्भात झपाट्याने विकसित होत असलेल्या अकोला शहरात वायू प्रदूषणाचा टक्का वाढतच असून, यावर्षी हिवाळ्यात ऑक्टोबर महिन्यातील ३१ ही दिवस प्रदूषित म्हणून नोंद झाल्यानंतर आता संपूर्ण नोव्हेंबर महिना देखील वायू प्रदूषणाचा ठरला आहे. नोव्हेंबर महिन्यात एकही दिवस हवेचा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ५१ पेक्षा कमी नसल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. विशेष म्हणजे या महिण्यात सुक्ष्म धूलिकणाचे प्रदूषण जास्त वाढले आहे.
अलीकडील वर्षात अकोला शहरात हवेची गुणवत्ता अतिशय खालावली आहे. वाहनांची वाढती संख्या, त्यातून निघणारा धूर, धूळ, रस्त्यावरील धूळ, कचरा ज्वलन, बांधकाम आणि स्थानिक उद्योग इत्यादी अनेक कारणांमुळे अलीकडच्या काळात जिल्ह्यात प्रदूषणात मोठी वाढ झाली असून त्यातून आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मागील काही वर्षांत अकोल्याचे प्रदूषण वाढले असून दिवाळी सणात यामध्ये वाढ हाेण्याची शक्यता आहे. हवा गुणवत्ता निर्देशांक काढण्यासाठी धूलिकण, २.५, १०. ओझोन, कार्बन मोनॉक्साइड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड या प्रदूषकांचा विचार केला जातो. अकोला शहरात नोव्हेंबर महिन्यात दोन दिवस वायू गुणवत्ता निर्देशांक ३०० ते ४०० दरम्यान राहिल्याची नोंद आहे.
अकोला शहराचा नोव्हेंबर महिन्याचा हवा गुणवत्ता निर्देशांक
एक्यूआय : श्रेणी : किती दिवस
० ते ५० : चांगला : ००
५१ ते १०० : समाधानकारक : ०४
१०१ ते २०० : प्रदूषित : १९
२०१ ते ३०० : जास्त प्रदूषित : ०५
३०१ ते ४०० : अती प्रदूषित : ०२
४०१ ते ५०० : धोकादायक प्रदूषण : ००
वाढत्या वायू प्रदुषणासाठी वाहनांची वाढती संख्या, धुळीचे रस्ते, कचरा ज्वलन, कोळसा ज्वलन आणि शहरातील व्यावसायिक प्रतिष्ठाने कारणीभूत असतात. वृक्षसंख्येत वाढ करणे, वाहनांच्या संख्येत घट करणे, कचरा न जाळणे, उद्योगांनी प्रदूषण रोखणे अशा विविध उपाययोजना राबविण्यात आल्या तरच प्रदूषणावर नियंत्रण मिळवता येऊ शकेल.
प्रा. सुरेश चोपणे,
पर्यावरण अभ्यासक, चंद्रपूर