आता प्रत्येक गावाचा कृषी विकास आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:17 AM2021-04-19T04:17:31+5:302021-04-19T04:17:31+5:30
खरीप हंगामाचा ग्राम कृषी आराखडा तयार करताना पाण्याचा ताळेबंद विचारात घेऊन येत्या हंगामात पीक रचना व पीक पद्धतीमध्ये बदल ...
खरीप हंगामाचा ग्राम कृषी आराखडा तयार करताना पाण्याचा ताळेबंद विचारात घेऊन येत्या हंगामात पीक रचना व पीक पद्धतीमध्ये बदल करण्याबाबत विचार करून त्यानुसार नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ग्रामपंचायतस्तरावर जमिनीचा सुपीकता निर्देशांक लावण्यात आला आहे. शेतकऱ्यांना फलक समजावून सांगून त्यानुसार खतांच्या संतुलित वापरास प्रोत्साहन व किमान १० टक्के रासायनिक खतांची बचत करणे व शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे, मागील खरीप हंगामातील गावनिहाय, पीकनिहाय क्षेत्र उत्पादन उत्पादकता कृषी समितीच्या निदर्शनास आणून उत्पादकता वाढीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे.
गावाच्या गरजेनुसार प्रमुख पिकांच्या सरळ वाणाचे बीजोत्पादन केले जाणार असून, मूलस्थानी जलसंधारण करण्यासाठी जनजागृती करून रुंद सरी व वरंभा पद्धती सोयाबीन पेरणी करणे, गावाच्या गरजेनुसार कार्यशाळा आयोजित करून माती नमुना काढणे, बीजप्रक्रिया करणे, बियाणे उगवणक्षमता तपासणे इत्यादी मोहिमा राबविण्यात येणार आहेत. गावाच्या गरजेनुसार किमान एक कृषी प्रक्रिया उद्योग उभारणीसाठी प्रयत्न करणे, शेततळे केले जाणार आहे. पाण्याच्या फळबागांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. ‘विकेल ते पिकेल’ या अभियानाचा उद्देश लक्षात घेऊन बाजारात मागणी असलेल्या व नवीन पिकांची लागवड क्षेत्र वाढ करून मूल्यसाखळी विकसित केली जाणार आहे.
--बॉक्स--
समितीमध्ये यांचा सहभाग
राज्यात प्रथमच ग्राम कृषी विकास समिती स्थापन केली जाणार आहे. त्या समितीमध्ये लोकप्रतिनिधी, गावातील प्रगतिशील शेतकरी व कर्मचाऱ्यांचा समावेश राहणार आहे. त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून आपल्या गावाचा विकास आराखडा तयार करून कृषी क्षेत्राचा विकास घडवावा, असे आवाहन कृषी विभागाकडून केले जाणार आहे.
--बॉक्स--
मोबाईलवरून भरता येईल माहिती
प्रत्येक गावाचा कृषी विस्तार आराखडा तयार करताना सर्व माहिती ही मोबाईलव्दारे भरता येणार आहे, त्याप्रकारची सुविधा सुद्धा संबंधित कर्मचाऱ्याच्या मोबाईलमध्ये करण्यात येणार आहे.