आता भाजपचे लक्ष्य ‘मिनी मंत्रालय’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 01:28 PM2019-10-29T13:28:56+5:302019-10-29T13:29:01+5:30

मिनी मंत्रालयाची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची तर वंचित बहुजन आघाडी अन् काँग्रेस आघाडीसाठी अतिस्तावाच्या लढाईची ठरणार आहे.

 Now BJP's target is Akola ZP Election | आता भाजपचे लक्ष्य ‘मिनी मंत्रालय’!

आता भाजपचे लक्ष्य ‘मिनी मंत्रालय’!

Next

- राजेश शेगोकार

अकोला: लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळविलेले यश व वंचित बहुजन आघाडीचा ढासळलेला बुरूज पाहता आता भाजपसमोर जिल्हा परिषद निवडणूक हेच लक्ष्य असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्हा परिषदेवर भाजपने आतापर्यंत झेंडा फडकविला नसल्याने शतप्रतिशत भाजप हे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी मिनी मंत्रालयाची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची तर वंचित बहुजन आघाडी अन् काँग्रेस आघाडीसाठी अतिस्तावाच्या लढाईची ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्र्यांनी अकोल्यात घेतलेल्या सभेत खासदार संजय धोत्रे यांनी जिल्हा परिषदेवर हल्लाबोल करीत ‘नवी पाइपलाइन’ टाकण्याची भाषा केली होती. तो संदर्भ भाजपने गांभीर्याने घेतला असून, विधानसभेच्या निवडणुकीतच जिल्हा परिषदेच्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी तसेच इतर पक्षातील कार्यकर्त्यांना गळाला लावण्याचे प्रकार झाले आहेत.
जिल्हा परिषदेवर भारिप-बमसंची सत्ता असून, भारिपचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांना लक्ष्य कारण्यासाठी धोत्रेंनी लोकसभेच्या प्रचारात जिल्हा परिषद निवडणुकीचे आव्हान प्रचारातच दिले होते. त्याचाच परिणाम म्हणून विधानसभेच्या आखाडयातून ‘ वंचित’ला पूर्णपणे बाद करण्यात भाजप यशस्वी झाले आहे. अकोला पूर्व, अकोट, बाळापूर व मूर्तिजापूर या चार मतदारसंघात भाजपने यशाचा झेंडा गाडला असल्याने येथून जिल्हा परिषदेत मतांचे भरघोस पीक येईल या अपेक्षेत भाजपचे नेते आहेत. त्यामुळेच विधानसभेच्या निवडणुकीत ज्यांनी चांगले काम केले त्यांना उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रचारात इतर पक्षातील चांगले कार्यकर्ते आपल्याकडे वळवून भाजपने सुरुवात केली असल्याचेही या निमित्ताने स्पष्ट होत आहे.
 
विजयासाठी दिलेली झुंज इशाराच!
जिल्हा परिषदेचे मतदार असलेल्या ग्रामीण भागातील चारही मतदारसंघात भाजपच्या उमेदवारांना विजयासाठी वंचित बहुजन आघाडीने चांगलेच झुंजवले आहेत. भाजपाचे जिल्हा परिषदेसाठी ‘३५ प्लस’ हे मिशन ठरविल्याची यापूर्वीच जाहीर केले आहे. त्यामुळे हे मिशन गाठण्यासाठी भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.
मोदी लाट ओसरली अशी हाकाटी पिटत विरोधकांनी प्रचाराचा धुराळा उडविला; मात्र २०१४ पेक्षाही अधिक २०१९ मध्ये मोदी लाटेचा तडाखा बसला. लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्य मिळवित भाजपाने आपला जनाधार आणखी मजबूत केला असून, आता अकोल्यातील सहाही विधानसभा मतदारसंघासह जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचे ‘लक्ष्य’ समोर ठेवले आहे.
 
 

 

Web Title:  Now BJP's target is Akola ZP Election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.