आता भाजपाचे लक्ष्य विधानसभेसह मिनी मंत्रालय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:34 PM2019-05-25T12:34:53+5:302019-05-25T12:36:13+5:30
भाजपाने आपला जनाधार आणखी मजबूत केला असून, आता अकोल्यातील सहाही विधानसभा मतदारसंघासह जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचे ‘लक्ष्य’ समोर ठेवले आहे.
- राजेश शेगोकार
अकोला: मोदी लाट ओसरली अशी हाकाटी पिटत विरोधकांनी प्रचाराचा धुराळा उडविला; मात्र २०१४ पेक्षाही अधिक २०१९ मध्ये मोदी लाटेचा तडाखा बसला. लोकसभा निवडणुकीत प्रचंड मताधिक्य मिळवित भाजपाने आपला जनाधार आणखी मजबूत केला असून, आता अकोल्यातील सहाही विधानसभा मतदारसंघासह जिल्हा परिषद ताब्यात घेण्याचे ‘लक्ष्य’ समोर ठेवले आहे.
२०१४ ची लोकसभा निवडणूक ही देशाच्या राजकारणाचे चित्र आमूलाग्र बदलविणारी ठरली. मोदी लाटेचा करिष्मा उभ्या देशाने अनुभवला. यामध्ये अकोला लोकसभा मतदारसंघानेही या लाटेवर स्वार होत ‘कमळ’ फुलविले. लोकसभा निवडणुकीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाचा वरचष्मा राहिला असला, तरी रिसोड व बाळापूर या दोन मतदारसंघांवर भाजपाला विजय मिळविता आला नाही तसेच अकोला पूर्व या मतदारसंघात अवघ्या २ हजार ४४० मतांनी भाजपा जिंकली. त्यामुळे सहापैकी तीन मतदारसंघांत भाजपासमोर आव्हान उभे राहू शकते, असे आकडे सांगतात; मात्र आकड्यांचा हा खेळ परवाच्या लोकसभा निवडणूक निकालांनी ‘निकालात’ काढला आहे. येऊ घातलेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी युती अन् कायम राहिली व जागा वाटपाचा गुंता सुरळीत सुटला तर भाजपाचे आव्हान मोडून काढण्याचे मोठे आव्हान काँग्रेस आघाडीसमोर राहणार आहे. सर्वच विधानसभा मतदारसंघाच्या क्षेत्रात भाजपाने घेतलेली मते ही काँग्रेस व वंचितसाठी आव्हानात्मक आहे. युती, आघाडीचा गुंता सुरळीत सुटला तर या दोन मित्रांच्या आघाडी व वंचित बहुजन आघाडी असा तिरंगी सामना प्रत्येक मतदारसंघात ठरलेला आहे. लोकसभा निकालाच्या पृष्ठभूमीवर विचार केला तर भाजपाचे पारडे जड दिसते.
युतीचा गुंता अन् आघाडीचे त्रांगडे!
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी युती अन् आघाडी कायम राहिली तर सर्वात आधी जागा वाटपाचा गुंता निर्माण होऊ शकतो. अकोल्यातील पाच विधानसभा मतदारसंघांपैकी भाजपाने चार मतदारसंघांत विजय मिळविला आहे. त्यामुळे सेनेला एक मतदारसंघ भाजपाला देणे सहज शक्य आहे; मात्र सेनेचा बाळापूर व अकोट अशा दोन मतदारसंघांवर दावा असल्याने भाजपासमोर उघड बंडखोरीचे आव्हान उभे राहू शकते. आघाडीमध्ये काँग्रेसला तीन व राष्टÑवादीला दोन असे मतदारसंघ दिले असले तरी आता राष्टÑवादीला अकोला पश्चिम किंवा बाळापूर असा एक मतदारसंघ हवा असल्याने आघाडीतही तेच चित्र राहील. भाजपाचे अकोल्यावर वर्चस्व असले तरी युतीमध्ये सेनेला तसेच घटक पक्ष असलेल्या शिवसंग्रामच्याही अपेक्षांचे ओझे भाजपावर राहणार आहे. त्यामुळे भाजपाच्या उमेदवारांसमोरही बंडखोरीचे संकट कायमच आहे.