आता ‘क्लबफुट’चा उपचार सर्वोपचारमध्येच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 02:21 PM2019-07-14T14:21:15+5:302019-07-14T14:21:24+5:30

महागड्या उपचारामुळे अनेक जण उपचार टाळतात; मात्र आता क्लबफुटचा हा उपचार सर्वोपचार रुग्णालयातच होणार आहे.

Now 'Clubfoot' is treated with care! | आता ‘क्लबफुट’चा उपचार सर्वोपचारमध्येच!

आता ‘क्लबफुट’चा उपचार सर्वोपचारमध्येच!

Next

- प्रवीण खेते 
अकोला : ‘क्लबफुट’ म्हणजेच जन्मत:च तिरळे पाय असल्याने अनेकांना उभे राहणे अन् चालणे शक्य होत नाही. जिल्ह्यातही असे अनेक चिमुकले या आजाराने ग्रस्त आहेत. महागड्या उपचारामुळे अनेक जण उपचार टाळतात; मात्र आता क्लबफुटचा हा उपचार सर्वोपचार रुग्णालयातच होणार आहे. या उपक्रमाचा प्रारंभ शनिवारपासून झाला असून, पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील १७ चिमुकल्यांची तपासणी करण्यात आली.
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि क्युअर इंटरनॅशनल इंडिया ट्रस्ट (सीआयआयटी) अंतर्गत शनिवार, १३ जुलै रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात क्लबफुट सेलचे उद््घाटन करण्यात आले. जिल्ह्यातील क्लबफुटच्या रुग्णांचा शोध घेऊन त्यावर उपचार करण्याच्या उद्देशाने या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे. उपक्रमाच्या पहिल्याच दिवशी जिल्ह्यातील १७ चिमुकल्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात आला. यातील दोन बालकांवर शस्त्रक्रिया, तर १५ बालकांच्या पायाला प्लॅस्टर करून त्यांना पुढील तपासणीसाठी वेळ दिली आहे. क्लबफुट सेलच्या उद््घाटनाप्रसंगी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. दिनेश नैताम, डॉ. श्यामकुमार शिरसाम, ‘आरबीएसके’चे नंदू कांबळे, ‘सीआयआयटी’चे राज्य प्रबंधक सचिन फोळ व डॉ. अमित जाधव यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

प्रत्येक शनिवारी होणार तपासणी!
‘क्लबफुट’च्या रुग्णांवर आता दर शनिवारी सर्वोपचार रुग्णालयात विशेष तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे शहरी भागासह ग्रामीण भागातील क्लबफुटच्या रुग्णांवर सर्वोपचार रुग्णालयातच होणार असून, गरजेनुसार रुग्णांना क्लबफुट शुजदेखील नि:शुल्क दिले जाणार आहेत.

‘आरबीएसके’ अंतर्गत रुग्णांचा शोध
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील अंगणवाडीच्या माध्यमातून ० ते ६ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांची तपासणी करण्यात येणार आहे. यांतर्गत क्लबफुटच्या रुग्णांची ओळख करून त्यांना उपचारासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात येणार आहे.

जीएमसी, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आणि ‘सीआयआयटी’तर्फे सर्वोपचार रुग्णालयात क्लबफुटच्या रुग्णांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. शनिवारपासून या उपक्रमास प्रारंभ करण्यात आला असून, ० ते ६ वर्ष वयोगटातील क्लबफुटच्या रुग्णांवर येथे उपचार केला जाणार आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

Web Title: Now 'Clubfoot' is treated with care!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.