आता मनपा उपायुक्त ‘रडार’वर!
By admin | Published: July 7, 2016 02:19 AM2016-07-07T02:19:11+5:302016-07-07T02:19:11+5:30
कर्तव्यात कसूर केल्याचा सभापतींचा ठपका.
अकोला: महापालिका आयुक्त अजय लहाने व सत्तापक्ष भाजपच्या पदाधिकार्यांमधील वाद शमण्याची चिन्हे दिसत नसतानाच आता स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी मुख्य लेखापरीक्षक तथा प्रभारी उपायुक्त सुरेश सोळसे यांच्यावर निशाणा साधत त्यांच्यावर कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवला आहे. सभापतींच्या पत्रामुळे मुख्य लेखापरीक्षकांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
स्वायत्त संस्थांमध्ये अनेकदा धोरणात्मक निर्णय घेताना नियमावली, निकष बाजूला सारून विकास कामे निकाली काढावी लागतात, असा अलिखित नियम आहे. मागील काही दिवसांपासून महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी महाराष्ट्र महापालिका अधिनियमाच्या पुस्तकावर बोट ठेवूनच कारभार सुरू केला आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. महापौर उज्ज्वला देशमुख, स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनीदेखील महापालिका अधिनियमाचा आधार घेत प्रशासनावर ह्यलेटर बॉम्बह्णद्वारे हल्ला चढवल्याचे चित्र आहे.
या वादात आता मुख्य लेखापरीक्षक तथा प्रभारी उपायुक्त सुरेश सोळसे यांची नव्याने भर पडली आहे. मुख्य लेखापरीक्षकांनी वेळोवेळी स्थायी समितीकडे माहिती सादर करणे अपेक्षित असताना ते दुर्लक्ष करीत असल्याचा मुद्दा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी पत्रात उपस्थित केला आहे.
विविध कलम, पोटकलमांचा दाखला देत मुख्य लेखापरीक्षकांनी स्थायी समितीकडे आर्थिक नियोजनाच्या संदर्भात माहिती सादर करणे बंधनकारक असल्याचे नमूद करण्यात आले.