‘एनएचएम’ कर्मचाऱ्यांसाठी आता मूल्यांकन अहवाल!
By Atul.jaiswal | Published: April 5, 2018 03:05 PM2018-04-05T15:05:27+5:302018-04-05T15:05:27+5:30
अकोला: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे भवितव्य त्यांच्या ‘परफॉर्मन्स’वर ठरविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे.
- अतुल जयस्वाल
अकोला: राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नोकरीचे भवितव्य त्यांच्या ‘परफॉर्मन्स’वर ठरविण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी ‘एचआर परफॉर्मन्स इंडिकेटर्स’ तयार करण्यात आले असून, कामगिरीनुसार त्यांना पगारवाढ द्यायची, नोकरीवर कायम ठेवायचे की सेवा थांबवावी, हे ठरणार आहे. राष्ट्रीय शहर आरोग्य अभियानाचे अतिरिक्त संचालक सतीश पवार यांनी २ एप्रिल रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स्ािंगद्वारे या सूचना दिल्याने कंत्राटी कर्मचाºयांची घालमेल वाढली असून, या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवित राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने येत्या ११ एप्रिलपासून बेमुदत काम बंदची हाक दिली आहे.
आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने तुटपुंजा मानधनावर कार्यरत असलेले ‘एनएचएम’ कर्मचारी आरोग्यसेवेत कायम करून घेण्याच्या मागणीसाठी गत अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. आरोग्य संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या या कर्मचाºयांना दरवर्षी अकरा महिन्यांची पुनर्नियुक्ती एक दिवसाचा तांत्रिक खंड देऊन देण्यात येते. समान काम-समान वेतन व कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी हे कर्मचारी आंदोलन करीत आहेत. त्यांना सेवेत सामावून घेण्याची शक्यता पडताळण्यासाठी आरोग्य विभागाने अभ्यास समिती गठित केली असतानाच, आयुक्त, आरोग्यसेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या कार्यालयाकडून २ एप्रिल रोजी राज्यभरातील जिल्हा कार्यालयांना कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मूल्यांकन अहवालाची एक्सलशिट पाठविण्यात आली आहे. यामध्ये कामाच्या स्वरूपानुसार गुणांकन पद्धती असून, त्यावर आधारित मूल्यांकन अहवाल तयार होणार आहे. मूल्यांकन अहवालानुसार कंत्राटी कर्मचाºयांना पगारवाढ, नोकरीवर कायम ठेवणे किंवा कमी करणे या बाबी निश्चित करण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाच्या निर्णयाला विरोध दर्शविण्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने येत्या ११ एप्रिलपासून बेमुदत काम बंदचा इशारा दिला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना यापुढे सहा महिन्यांची पुनर्नियुक्ती देण्याच्या सूचनाही अतिरिक्त संचालकांनी दिल्याचे संघटनेचे म्हणणे असून, त्यालाही संघटनेचा विरोध असल्याचे संघटनेचे सचिव विजय सोनोने यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
काय आहेत मानांकने?
कामगिरी परिणाम
अतिउत्तम (९५ टक्के किंवा जास्त) १५ टक्के पगारवाढ
उत्तम (८०-९५ टक्के) १० टक्के पगारवाढ
खूप चांगली (६५-७९ टक्के) ५ टक्के पगारवाढ
समाधानकारक (४० ते ६४ टक्के) नोकरी कायम
असमाधानकारक (४० टक्क्यांपेक्षा कमी) सेवा समाप्त
संघटनेचा आक्षेप
कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे ज्या कामाची जबाबदारी नाही किंवा जे काम त्यांच्या जॉबचार्टमध्ये नाही, त्याकरिता त्यांना जबाबदार धरून त्यांचे मूल्यांकन कमी करण्याचा प्रयत्न या एक्सलशिटमध्ये असल्याचा आरोप संघटनेचा आहे. आर्थिक बाबींचे अधिकार कंत्राटी कर्मचाºयांना नसतानाही, त्यासाठी त्यांना जबाबदार ठरविणे अत्यंत चुकीचे व अन्यायकारक असल्याचे राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघाने आयुक्त, आरोग्यसेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कंत्राटी कर्मचाऱ्यांना जॉबचार्टनुसारच एक्सलशिट देण्यात आली आहे. कामगिरीनुसार त्यांचे मूल्यांकन करण्यात येऊन, त्यावर त्यांची पगारवाढ किंवा इतर बाबी अवलंबून राहणार आहेत.
- डॉ. नितीन अंबाडेकर, आरोग्य उपसंचालक, आरोग्यसेवा, अकोला मंडळ.