आता अपेक्षा मंत्रिपदाची !

By admin | Published: May 17, 2014 11:52 PM2014-05-17T23:52:26+5:302014-05-18T23:04:41+5:30

भाजपचे संजय धोत्रे अमरावती विभागातील एकमेव भाजपचे खासदार; त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील नागरिकांना आहे.

Now expect the minister! | आता अपेक्षा मंत्रिपदाची !

आता अपेक्षा मंत्रिपदाची !

Next

विवेक चांदूरकर - अकोला

         लोकसभेचा निकाल लागला असून, भारतीय जनता पक्षाचे संजय धोत्रे यांनी तिसर्‍यांदा विजय मिळविला आहे. केंद्रात भारतीय जनता पक्षाची आलेली सरकार, नितीन गडकरींसह वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे असलेले दृढ संबंध व अमरावती विभागातील एकमेव खासदार या सर्वच बाबी संजय धोत्रेंच्या बाजूने जमेच्या असल्यामुळे आता त्यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांसह जिल्ह्यातील नागरिकांना आहे.
         विदर्भातून १० लोकसभांपैकी ४ शिवसेनेचे तर सहा भाजपचे खासदार आहेत. यापैकी नागपूर विभागातून भाजपचे दिग्गज नेते विजयी झाले आहेत. यामध्ये नागपूरचे नितीन गडकरी व चंद्रपूरचे हंसराज अहीर यांचा समावेश आहे. अमरावती विभागातून चारपैकी एकच भाजपचे खासदार संजय धोत्रे विजयी झाले आहेत तर यवतमाळ-वाशिममधून भावना गवळी, अमरावतीहून आनंद अडसूळ व बुलडाण्यातून प्रतापराव जाधव हे शिवसेनेचे खासदार आहेत. त्यामुळे धोत्रे यांचा दावा प्रबळ आहे. पक्षाने अमरावती व नागपूर विभागातून एकाला जरी मंत्रिपद दिले तर धोत्रे यांना मंत्रिपद मिळण्याची आशा आहे. संजय धोत्रे यांनी तीनही वेळा मोठ्या फरकाने विजय मिळवित लोकसभेवर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. त्यांचे भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी व विधानसभेतील विरोधी पक्षनेते भाऊसाहेब पुंडकर यांच्याशी असलेले संबंध पाहता त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. अकोला लोकसभा मतदारसंघातून अनेक दिग्गज नेते खासदार झाले असले तरी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मात्र आतापर्यंत एकदाही स्थान मिळू शकले नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. मंत्रिमंडळात स्थान व महत्त्वाचे पद मिळाले नसल्यामुळे मतदारसंघाचा विकास होऊ शकला नाही.

*संजय धोत्रे मिळवतील जिल्ह्याचे पहिले केंद्रीय मंत्री होण्याचा मान?

         जिल्ह्यात १९४७ पासून तर २०१४ पर्यंत झालेल्या १५ लोकसभा निवडणुकांमध्ये आठ खासदार झालेत. मात्र एकालाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. काँग्रेसमध्ये दबदबा असलेले आबासाहेब खेडकर यांनी महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर राज्याच्या राजकारणात सहभाग घेतल्याने केंद्रात ते मंत्री झाले नाहीत. भाजपचे पांडुरंग फुंडकर १९८९, १९९१, १९९६ ला तीन वेळा निवडून आले. मात्र, त्यावेळी केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. काँग्रेसचे के.एम. असगर हुसेन १९६७ व १९७१ च्या निवडणुकीत दोन वेळा विजयी झाले. मधुसुदन वैराळे हेही काँग्रेसचे वरिष्ठ नेते अकोल्याचे खासदार झाले. मात्र, त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. भारिपचे प्रकाश आंबेडकर व संजय धोत्रे हे दोन वेळा अकोल्याचे खासदार झाले आहेत. त्यांनाही मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही. गत दोन निवडणुकांपासून भाजपचे संजय धोत्रे खासदार आहेत तर केंद्रात काँग्रेसची सत्ता आहे. यावेळी खासदार सत्ताधारी पक्षाचा असण्याचा योग आला आहे. त्यामुळे संजय धोत्रे अकोल्याचे पहिले केंद्रीय मंत्री होण्याचा मान मिळवतील काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Now expect the minister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.