आता १४ दिवसांच्या उधारीवर रेल्वे प्रवास शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 05:43 PM2019-07-01T17:43:31+5:302019-07-01T17:43:36+5:30
अकोला: आयआरसीटीसीच्या नवीन योजनेमुळे आता १४ दिवसांच्या उधारीवर रेल्वे प्रवास करणे शक्य झाले आहे.
- संजय खांडेकर
अकोला: आयआरसीटीसीच्या नवीन योजनेमुळे आता १४ दिवसांच्या उधारीवर रेल्वे प्रवास करणे शक्य झाले आहे. यासाठी प्रवाशाला ३.५ टक्के सर्व्हिस चार्ज मोजावे लागणार आहे. या प्रणालीमुळे आता रेल्वे तिकिटाचे आरक्षण करणे सोपे झाले आहे.
जर आपण उन्हाळी सुट्ट्यांचे नियोजन करीत असाल आणि बजेटची समस्या असेल तर घाबरण्याचे काही कारण कारण नाही. आयआरसीटीसीने अभिनव अशी योजना आणली आहे. त्यात १४ दिवसांच्या उधारीवर तुम्हाला तिकीट बुक करता येते. भारतीय रेल्वेच्या वेबसाइटवरील प्रवाशांना ही क्रेडिट सुविधा दिली जात आहे. या योजनेअंतर्गत प्रवास करण्याच्या केवळ पाच दिवस आधी तिकीट बुक करणे गरजेचे आहे. तिकीट बुक केल्यानंतर १४ दिवसांत ही रक्कम भरावी लागणार आहे. त्यावर ३.५ टक्के सर्व्हिस चार्ज देणे सक्तीचे आहे. या व्यवस्थेसाठी आयआरसीटीसीने मुंबईच्या एका कंपनी ईपेलेटरसोबत करार केला आहे. जर १४ दिवसांत प्रवाशाने तिकिटाची रक्कम भरली नाही तर आयआरसीटीसी त्या प्रवाशाविरुद्ध कायदेशीर कारवाई करीत दंड वसूल करू शकते. जर दुसऱ्यांदादेखील प्रवाशाने हीच वागणूक ठेवली तर त्याला या योजनेपासून वंचित केले जाऊ शकते.
बँक लोनप्रमाणे सुविधा
एखादी वस्तू विकत घेण्यासाठी ग्राहकास लोन दिले जाते. यासाठी बँक क्षेत्रात स्पर्धा सुरू झाली आहे. त्याचप्रमाणे आता प्रवासासाठीदेखील लोन दिले जात आहे. त्यासाठी करार केला जातो. आयआरसीटीसीतून रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी प्रवाशाला कितीची क्रेडिट दिली गेली पाहिजे हे त्या व्यक्तीच्या क्रेडिट हिस्ट्री, डिजिटल फुटप्रिंट, डिवाइस इन्फर्मेशन आणि आॅनलाइन विक्री व्यवहारावर ठरणार आहे.
असे करता येईल आरक्षण
या सेवेसाठी आयआरसीटीसीच्या वेबसाइटवर जाऊन आधी अधिकृत रजिस्ट्रेशन करावे लागेल. त्यानंतर व्यक्तिगत आवश्यक असलेली माहिती त्यावर द्यावी लागेल. त्यानंतर पर्याय दिले जातात. त्याची निवड केल्यानंतर ई-पे-लेटर खात्यात लॉगीन करावे लागते. त्यात तिकिट बुकिंगची रक्कम निश्चित होते.