नेट बँकिंग कळणारा आता साक्षर - प्राचार्य बी.जी. शेखर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 09:24 PM2018-01-23T21:24:51+5:302018-01-23T21:31:25+5:30
अकोला : यापुढे ज्यांना नेट बँकिंग व्यवहार कळतात ते साक्षर व इतर निरक्षर म्हणण्याची वेळ आली आहे. म्हणूनच आता प्रत्येकाने हे ज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. त्यासोबतच या क्षेत्रात होणार्या दुरुपयोगाविषयी सतर्क असले पाहिजे, असे प्रतिपादन अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बी.जी. शेखर यांनी मंगळवारी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : यापुढे ज्यांना नेट बँकिंग व्यवहार कळतात ते साक्षर व इतर निरक्षर म्हणण्याची वेळ आली आहे. म्हणूनच आता प्रत्येकाने हे ज्ञान अवगत करणे गरजेचे आहे. त्यासोबतच या क्षेत्रात होणार्या दुरुपयोगाविषयी सतर्क असले पाहिजे, असे प्रतिपादन अकोला पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य बी.जी. शेखर यांनी मंगळवारी केले.
अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्यावतीने जिल्हय़ात सायबर गुन्ह्याविषयी जनजागृती करण्यात येत आहे. मंगळवार, २३ जानेवारी रोजी श्री शिवाजी महाविद्यालयात या विषयावर माध्यम, विद्यार्थ्यांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर होते. प्रमुख अतिथी म्हणून बी. जी. शेखर तसेच अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, एक्सीस बॅंकेचे सहायक उपाध्यक्ष निशिकांत उपाध्ये, श्री शिवाजी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एम. आर. इंगळे, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक विलास पाटील, सायबर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष मीरसाहेब यांची प्रमुख उपस्थिती होती.
शेखर यांनी सामाजिक माध्यमाचे फायदे तेवढेच तोटे उदारणासह विषद केले. या समाज माध्यमाची माहिती सर्वांसाठी खुली असून, पोलिसांकडेदेखील ती उपलब्ध असते, त्यामुळे समाजात वितंडवाद होईल, अशा पोस्ट करणे टाळावे, तसेच या माध्यमातून होणारी फसवणूक कशी जिवावर बेतली जाते, घडलेली सत्य घटनांवर उदाहरणे दिली. आपला पासवर्ड, ओटीपी कदापि कुणाला देऊ नसे, असे आवाहन त्यांनी केले.
राकेश कलासागर यांनी तंत्रज्ञानामुळे जग जवळ आले, यामुळे जगाच्या सीमारेषा पुसल्याचे सांगताना, हे तंत्रज्ञान जेवढे फायदेशीर आहे तेवढेच विघातक आहे. त्यामुळे यातून आपल्याला हवे असलेल्या ज्ञानाचाच उपयोग करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येकाने काळजीपूर्वक समाज माध्यमाचा वापर करावा, संगणक, इंटरनेट, मोबाइल तंत्रज्ञानाचा वापर करू न बँकेचे व्यवहार करताना, प्रत्येकाने काळजी घ्यावी, आपण थोडी जरी चूक केली तर आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते, त्यामुळे निनावी येणारे फोन, मेल, आदीबाबत नागरिकांनी सतर्क असले पाहिजे, असे ते म्हणाले. सायबर गुन्ह्यासंदर्भात त्यांनी विविध मुद्दे समजावून सांगितले.
उपाध्ये यांनी विविध प्रकारची फसवणूक कशी केली जाते, याची चित्रफितीद्वारे माहिती दिली. त्यांनी विशिंग, फिशिंग, व्हॉटसअँपद्वारे होणारी आर्थिक फसवणूक आदींची इत्थंभूत माहिती दिली. विजयकांत सागर यांनी समाज माध्यमाचा वापर चांगल्या कामासाठी करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यासंदर्भात त्यांनी या माध्यमाचा वापर करू न समाजमन कलुषित करण्याचा घडलेला प्रकार कथन केला. त्यांनीच त्या प्रकरणाचा तपास केल्याचे सांगितले. पाटील यांनी उत्कृष्ठ संचालक व सायबर गुन्ह्याची विस्तृत माहिती विषद केली. डॉ. इंगळे यांनी आभार व्यक्त केले.