आता महात्मा फुले जनआरोग्य योजना
By Admin | Published: April 24, 2017 01:56 AM2017-04-24T01:56:48+5:302017-04-24T01:56:48+5:30
विद्यमान योजनेला ३० जूनपर्यंत मुदतवाढ : जिल्ह्यात १ एप्रिलपासून योजना लागू
अकोला: सर्वसामान्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय उपचार सेवा पुरविणारी राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नामकरण आता महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना असे करण्यात आले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीकरिता विमा कंपनीची निवड करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर असल्याने दरम्यानच्या काळात लाभार्थींच्या विमा संरक्षणात खंड पडू नये, यासाठी विद्यमान राजीव गांधी जीवनदायी योजना १ एप्रिल ते ३० जून २०१७ या कालावधीत ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना’ या नावाने सुरू ठेवण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. राजीव गांधी जीवदायी आरोग्य योजना राज्यात २ जुले २०१२ रोजी आठ जिल्ह्यात सुरू झाली होती. त्यानंतर उर्वरित २७ जिल्ह्यांमध्ये २१ नोव्हेंबर २०१३ रोजी ही योजना सुरू करण्यात आली. शेवटच्या घटकापर्यंत मोफत व गुणवत्तापूर्ण वैद्यकीय सेवा पोहचविण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या या योजनेसाठी एक लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असलेले कुटुंब पात्र आहेत. या योजनेत पात्र लाभार्थींसाठी निवडलेल्या ९७१ आजारांवरील उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. यासाठी राज्यातील मान्यताप्राप्त शासकीय व खासगी रुग्णालये अंगीकृत करण्यात आली आहेत. यासाठी महाराष्ट्र शासन विमा हप्ता भरत असल्यामुळे निवडक आजारांसाठी पात्र लाभार्थींना निवडक रुग्णालयांमध्ये कोणतीही रक्कम न देता उपचार घेता येतात. दरम्यान, १ एप्रिल २०१७ पासून राजीव गांधी जीवनदायी योजना ही महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य या नावाने राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तथापि, सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता विमा कंपनीची निवड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यानच्या काळात काळात लाभार्थींच्या विमा संरक्षणात खंड पडू नये, यासाठी विद्यमान राजीव गांधी जीवनदायी योजना १ एप्रिल ते ३० जून २०१७ या कालावधीत ‘महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना’ या नावाने सुरू राहणार आहे. त्यानंतर ही योजना संपूर्णपणे नव्या रूपात अस्तित्वात येणार आहे.
जिल्ह्यात १५ रुग्णालये अंगीकृत
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना जिल्ह्यात २१ नोव्हेंबर २०१३ पासून अकोला जिल्ह्यात कार्यान्वित आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात २ शासकीय व १३ खासगी अशी एकूण १५ रुग्णालये अंगीकृत केली आहेत. आतापर्यंत १२,५८४ लाभार्थींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यासाठी ४० कोटी ९३ लाख ३४ हजार ८८ रुपये मंजूर झाले आहेत.
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव बदलल्याने ती आता महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना या नावाने ओळखली जाईल. योजनेचे स्वरूप मात्र कायम आहे. पात्र लाभार्थींनी या योजनेची योग्य माहिती घेऊन तिचा लाभ घ्यावा.
- डॉ. सुनील वाठोरे, जिल्हा समन्वयक अधिकारी, अकोला