आता घरोघरी जाणार महावितरणचे फिरते वीज भरणा केंद्र
By atul.jaiswal | Published: June 18, 2018 05:55 PM2018-06-18T17:55:17+5:302018-06-18T17:55:17+5:30
अकोला : वीज बिल भरणा केंद्र नसल्याने नियमित वीजबिल भरणा करण्यास अडचण येत असलेल्या ग्रामिण भागातील ग्राहकांसाठी महावितरणने त्यांच्या गावापर्यंत जाऊन त्यांना वीज बिल सहजरित्या भरता यावे, यासाठी फिरते वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
अकोला : वीज बिल भरणा केंद्र नसल्याने नियमित वीजबिल भरणा करण्यास अडचण येत असलेल्या ग्रामिण भागातील ग्राहकांसाठी महावितरणने त्यांच्या गावापर्यंत जाऊन त्यांना वीज बिल सहजरित्या भरता यावे, यासाठी फिरते वीजबिल भरणा केंद्र सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. महावितरणच्या अकोला मंडळातील बार्शीटाकळी व अकोट उपविभागांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. बार्शीटाकळी उपविभागाकरीता सोमवारी मोबाईल व्हॅनचा शुभारंभ करण्यात आला.
साप्ताहिक बाजाराला आलेल्या विद्युत ग्राहकांना बाजारस्थळीच त्यांच्या वीजबिलाचा भरणा करता यावा, या उद्देशाने हा उपक्रम राबविल्या जाणार आहे. या उपक्रमाअंतर्गत निवडण्यात आलेल्या या उपविभागामधील साप्ताहीक बाजार, सार्वजनिक ठिकाणांवर हे वाहन फिरविण्यात येणार असून, या फिरत्या विज भरणा केंद्राामध्ये इंटरनेट, संगणक आणि प्रिंटर आदीची सुविधा उपलब्ध राहणार आहे. याशिवाय या वाहनात ग्राहकांना माहिती मिळण्यासाठी उद्घोषणा करण्याची सुविधाही यामध्ये उपलब्ध राहणार आहे. अकोट आणि बाशीर्टाकळी उपविभागातील वीज बिल भरणा केंद्र नसलेली गावे, दुर्मिळ वस्ती आणि दुर्गम भागातील गावे तसेच दाट लोकवस्ती मात्र मोजकेच वीज बिल भरणा केंद्र असलेल्या गावांमध्ये हे फिरते केंद्र जाणार आहे. ज्या गावातील वीजबिलाची वसुली क्षमता कमी आहे, अशा गावातूनही ही मोबाईल व्हॅन फिरविल्या जाणार आहे.
मोबाईल कॅश कलेक्शन व्हॅनचा शुभारंभ
बार्शीटाकळी उपविभागाकरीता फिरत्या वीज बिल भरणा केंद्राचा शुभारंभ अकोला मंडळाचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांच्या हस्ते फीत कापून विद्युत भवन येथे करण्यात आला. यावेळी उपविधी अधिकारी सुनील उपाध्ये,प्रणाली विश्लेषक सचिन राठोड उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी विशाल पिपरे,जनसंपर्क अधिकारी विकास आढे, उपअभियंता विनोद सोनटक्के, काळे, उपव्यवस्थापक प्रमोद कांबळे, शंकर परचाके आणि गुरुमितसिंह गोसल, यांचेसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. लवकरच अकोट उपविभागाकरिता सुद्धा वीजबिल भरणा मोबाईल व्हॅन सुरु करण्यात येणार आहे.
जिल्हाभरात उपक्रम राबविण्याचा विचार
प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणाऱ्या या सुविधेला वीज ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादाचा आढावा तीन महिन्यांनंतर घेण्यात येणार आहे. वीज ग्राहकांकडून मिळणाºया प्रतिसादानुसार त्या ठिकाणी ही सुविधा पुढे सुरु ठेवण्याबाबत, तसेच उर्वरित जिल्ह्यात या सुविधेची व्याप्ती वाढविण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे महावितरणच्या अधिकाºयांनी सांगितले.