साहित्य संमेलनातील विचारमंथनावर आता कृतीची गरज!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 02:47 AM2017-11-27T02:47:12+5:302017-11-27T02:50:14+5:30
भंडारा देणे म्हणजे एैदी लोक तयार करण्याचा जणू कारखानाच बनला आहे, असा आरोप करून येणार्या काळात अशा बिनकामाच्या प्रथा बंद करा, या संमेलनात शेती व शेतकर्यांच्या संदर्भात जे विचार मंथन झाले त्यावर आता कृती करण्याची गरज असल्याचे आवाहन राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी केले.
नीलिमा शिंगणे - जगड ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला:(स्व.श्रीरामजी भाकरे महाराज साहित्य नगरी) - अलीकडच्या काळात भंडारा देण्याची पद्धत फोफावली आहे. कार्य कोणतेही असो दिला भंडारा. एवढेच नव्हेतर सामाजिक आंदोलने यशस्वी करायचे असेल तरीही हल्ली लोकप्रतिनिधी भंडारा देतात. जेथे जेवण ते आंदोलन कधी फेल पडत नाही. मात्र, राष्ट्रसंतांच्या विचार साहित्य संमेलनात गर्दी होत नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. भंडारा देणे म्हणजे एैदी लोक तयार करण्याचा जणू कारखानाच बनला आहे, असा आरोप करून येणार्या काळात अशा बिनकामाच्या प्रथा बंद करा, या संमेलनात शेती व शेतकर्यांच्या संदर्भात जे विचार मंथन झाले त्यावर आता कृती करण्याची गरज असल्याचे आवाहन राष्ट्रीय प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांनी केले.
अखिल भारतीय श्रीगुरुदेव सेवा मंडळ गुरुकुंज अंतर्गत वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सेवा समिती अकोलाच्यावतीने आयोजित ‘जगाचा पोशिंदा बळीराजा’ला सर्मपित पाचवे राज्यस्तरीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलन-२0१७ च्या समारोपप्रसंगी संमेलनाध्यक्ष म्हणून सत्यपाल महाराज बोलत होते. दोन दिवसीय या संमेलनाचा समारोप रविवारी झाला. यावेळीविचारपीठावर स्वागताध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते कृष्णा अंधारे, प्रमुख मार्गदर्शक गुरुकुंज आश्रमचे आजीवन प्रचारक आचार्य हरिभाऊ वेरू ळकर गुरुजी, आजीवन प्रचारक डॉ.भास्करराव विघे तसेच माजी मंत्री गुलाबराव गावंडे, उद्योजक गंगाधर पाटील, महाराष्ट्र राज्य आणि गोवा बार कॉन्सिलचे माजी अध्यक्ष अँड. मोतिसिंह मोहता, ज्ञानेश्वर साखरकर विराजमान होते.
सत्यपाल महाराज यांनी नेहमीच्याच परखड शैलीत चुकीच्या प्रथा परंपरावर आसूड ओढत, शेतकरी जगला तर देश जगेल हे केवळ शब्दांपुरते र्मयादीत ठेवू नका, शेतकर्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल होईल, आत्महत्या थांबतील अशा विचारांची कृतीची गरज असल्याचे प्रतिपादीत केले. माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांनी सांगितले, की सत्ता आणि सत्य जेव्हा जवळ येईल, तेव्हाच देशाची प्रगती होईल. समाज जागृत आहे, पण शासन जागृत नाही. असा आरोप केला. कृष्णा अंधारे यांनी सरकार कुठलेही असो शेतकर्यांचे शोषण पूर्वीपासूनच होत आहे. याचे उदाहरण द्यायचे म्हणजे सिलिंग कायदा. यामुळे अनेक सधन शेतकरी आज भूमिहिन झाले असल्याची खंत व्यक्त केली. भास्करराव विधे यांनी राष्ट्रसंतांचा विचार पूर्ण झाला, असे अजिबात नाही. फक्त त्यांच्या साहित्यातील काही मोतीच याठिकाणी सापडलेत. सागर रिकामा झाला नाही, असे प्रतिपादन केले. साहित्य संमेलनाला महाराजांच्या श्रद्धेने आणि विचारांनी पेटलेली माणसेचं आलेली आहेत. ग्रामगीतेचा विचार हा प्रयोगशील आहे. केवळ ग्रामगीतेला किंवा तुकडोजी महाराजांना मी मानतो, असे मानण्याने ज्ञान मिळत नाही, तर ती समजून घेण्याने ज्ञान मिळत असते, असे ज्ञानेश्वर साखरकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन श्रीकृष्ण पखाले यांनी केले.