आता व्हॉट्स अॅपद्वारेही पाठविता येणार वीज पुरवठा खंडित करण्याची नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 12:23 PM2018-09-17T12:23:01+5:302018-09-17T12:27:32+5:30
अकोला : थकीत वीज बिलापोटी ग्राहकास वीज पुरवठा खंडित करण्यासाठी ‘एसएमएस’, व्हॉट्स अॅप अथवा ई-मेल या डिजिटल माध्यमांद्वारे कलम ५६ अंतर्गत पाठविलेली नोटीस आता वैध मानली जाणार आहे.
अकोला : थकीत वीज बिलापोटी ग्राहकास वीज पुरवठा खंडित करण्यासाठी ‘एसएमएस’, व्हॉट्स अॅप अथवा ई-मेल या डिजिटल माध्यमांद्वारे कलम ५६ अंतर्गत पाठविलेली नोटीस आता वैध मानली जाणार आहे. नोटीस पाठविण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्याची मुभा वीज नियामक आयोगाने १२ सप्टेंबर रोजी जारी केलेल्या एका परिपत्रकाद्वारे महावितरणला दिली असून, यामुळे महावितरणच्या प्रशासकीय खर्चात बचत होणार आहे.
पेपरलेसच्या दिशेने वाटचाल करीत असलेल्या महावितरणकडून वीज बिलाची माहिती, वीज पुरवठा कधी बंद राहणार, यासह इतर माहिती वीज ग्राहकांना ‘एसएमएस’, व्हॉट्स अॅप व ई-मेलच्या माध्यमातून पाठविण्यात येते. एखाद्या ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करावयाचा असल्यास तशी नोटीस मात्र रजिस्टर टपालद्वारेच पाठवावी लागते. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि खर्चिक असल्यामुळे त्यामध्ये बदल करून डिजिटल माध्यमांचा वापर करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी महावितरणकडून करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत वीज नियामक आयोगाने मुंबई उच्च न्यायालयाच्या ११ जून २०१८ रोजीच्या एका निवाड्याचा संदर्भ देत महावितरणला डिजिटल माध्यमांद्वारे नोटीस पाठविण्याची परवानगी दिली आहे. ही मुभा मिळाल्यामुळे महावितरणला आता संबंधित ग्राहकांना व्हॉट्स अॅप, एसएमएस किंवा ई-मेलवर वीज पुरवठा खंडित करण्याबाबतची नोटीस पाठविणे पुरेसे ठरणार आहे.
नोटीस पाठविण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर केल्यास महावितरणच्या प्रशासकीय खर्चात बचत होऊ शकेल, असे वीज नियामक आयोगाने म्हटले आहे.
जनजागृती गरजेची
डिजिटल माध्यमांच्या वापरास मुभा देतानाच आयोगाने यासंदर्भात वीज ग्राहकांमध्ये जनजागृती करणे गरजेचे असल्यावर भर दिला आहे. संबंधित ग्राहकांना कोणत्या पद्धतीने नोटीस पाठविल्या जाऊ शकतात, याची माहिती करून देणे गरजेचे आहे. यासाठी विविध उपाययोजना करणे गरजेचे असल्याचेही आयोगाने म्हटले आहे.