‘सर्वोपचार’मध्ये रुग्णांच्या नातेवाईकांसाठी आता ‘पास’ प्रणाली
By atul.jaiswal | Published: April 19, 2018 03:44 PM2018-04-19T15:44:31+5:302018-04-19T15:46:17+5:30
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांसोबतचे नातेवाईक तसेच त्यांना भेटावयास येणाऱ्या नातेवाईकांना आता यापुढे रुग्णालय प्रशासनाकडून दोन विशिष्ठ पास देण्यात येणार आहेत.
अकोला : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात भरती होणाऱ्या रुग्णांसोबतचे नातेवाईक तसेच त्यांना भेटावयास येणाऱ्या नातेवाईकांना आता यापुढे रुग्णालय प्रशासनाकडून दोन विशिष्ठ पास देण्यात येणार आहेत. रुग्णालयातील वाढत्या गर्दीमुळे साफसफाई ठेवणे तसेच रुग्णसेवा देण्यात अडचणी येऊ नये, यासाठी शासनाने आदेशित केल्याप्रमाणे येत्या १ मे पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात अकोला जिल्हा व लगतच्या इतरही जिल्ह्यांमधून रुग्ण उपचारासाठी भरती होतात. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. रुग्णांसोबत ५ ते ६ नातेवाईक असतात. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाला रुग्णसेवा देणे, साफसफाई ठेवणे अडचणीचे ठरते. यासाठी शासनाने प्रत्येक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना पास प्रणाली सुरु करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाप्रमाणे उपाययोजना म्हणून १ मे २०१८ पासून रुग्णालयात भरती होणाºया रुग्णांसोबत असलेले नातेवाईक व भेटावयास येणाºया नातेवाईकांकरीता ‘पास प्रणाली ’ सुरु करण्यात येणार आहे. रुग्ण भरती होते वेळी त्यांना आंतररुग्ण भरती नोंदणी खिडकीमधून दोन वेगवेगळ्या पासेस देण्यात येतील. सदर पास प्रणाली सुरु झाल्यानंतर प्रशासनास रुग्णसेवा देणे सुलभ होईल. ही प्रणाली सुरळीतपणे लागू करण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला मदत करावी, असे आवाहन अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया, उपअधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे, डॉ. राजेश कार्यकर्ते, डॉ. दिनेश नेताम, डॉ. श्यामकुमार सिरसाम यांनी केले आहे.
रुग्णासोबतच्या नातेवाईकांसाठी पिवळी पास
रुग्ण भरती झाल्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या एकून दोन नातेवाईकांना प्रत्येकी एक अशा दोन पिवळ्या रंगाच्या पास देण्यात येतील. सदर पास ही रुग्ण भरती झाल्यापासून तीन दिवस वैध राहिल. गरज भासल्यास पासचे नुतणीकरण करून घेता येईल. रुग्णाला सुटी झाल्यानंतर सदर पासेस कक्षामध्ये अधिपरिचारिकांकडे जमा करणे गरजेचे आहे.
भेटीसाठी येणाऱ्यांना गुलाबी पास
रुग्णांना भेटण्यासाठी येणाºया नातेवाइकांना गुलाबी रंगाच्या पासेस देण्यात येतील. दोन नातेवाईकांना ही पास देण्यात येईल. या पास वर रुग्णांना सायंकाळी ४ ते ५ या वेळेत भेटता येईल. ही पास देखील तीन दिवस वैध असेल. त्यानंतर पासचे नुतनीकरण करून घ्यावे लागेल.
‘ओपीडी’मधील कक्षांचे क्रमांक बदलले
सर्वोपचार रुग्णालयातील आंतररुग्ण कक्ष व बाह्यरुग्ण विभागातील (ओपीडी) कक्षांचे क्रमांक सारखेच असल्यामुळे रुग्ण व सोबतच्या नातेवाईकांचा बरेच वेळा मोठा गोंधळ उडत होता. हा संभ्रम टाळण्यासाठी आता ‘ओपीडी’मधील कक्षांचे क्रमांक बदलण्यात आले आहेत.